सलमानच्या घराबाहेरील गोळीबारप्रकरणी अखेर भावोजीने सोडलं मौन; म्हणाला..
रविवारी 14 एप्रिल रोजी सलमानच्या मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं.
अभिनेता सलमान हा त्याचे वडील सलिम खान आणि आई सलमा खान यांच्यासोबत मुंबईतल्या वांद्रे इथल्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मध्ये राहतो. या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळाबार केला होता. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र सलमानचे चाहते त्याच्या सुरक्षेविषयी चिंतेत आहेत. या घटनेनंतर सलमानचा भाऊ अरबाज खानने सोशल मीडियावर पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली होती. आता सलमानचा भावोजी अर्थात बहीण अर्पिता खानचा पती आयुष शर्माने या घटनेवर मौन सोडलं आहे. “आमच्यासाठी हा खूप कठीण वेळ आहे आणि एक कुटुंब म्हणून आम्ही एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत”, असं तो म्हणाला.
आयुषने चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि काळजीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण गोळीबार प्रकरणी अद्याप पोलिसांचा तपास सुरू असल्याने त्याने त्यावर अधिक बोलणं टाळलं. “माझ्या मते या प्रकरणाची गंभीरचा लक्षात घेता त्यावर आता मी काहीही बोलणं किंवा जबाब देणं योग्य ठरणार नाही. मुंबई पोलिसांनी उत्तम काम केलंय आणि तपास अजून सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला मी चाहत्यांच्या प्रेम आणि काळजीबद्दल फक्त त्यांना धन्यवाद बोलू शकतो. सध्या या गोष्टींची आम्हाला खूप गरज आहे”, असं तो पुढे म्हणाला.
गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर पोस्ट लिहित गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर गुजरातमधून दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. दोघांनाही गुजरातमधील भूज शहरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहपोलीस (गुन्हे) आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावं असून त्यातील पाल याने अद्ययावत पिस्तुलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला.
सलमानला घाबरवण्यासाठी बिष्णोईकडून आरोपींना गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी दोन्ही आरोपींना आधी एक लाख रुपये मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. काम फत्ते झाल्यानंतर आरोपींना आणखी तीन लाख रुपये मिळणार होते. विकी गुप्ता हा दहावी पास असून सागर पाल आठवी शिकलेला आहे. सलमानच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार केल्यानंतर ते रात्रभर वांद्रे इथल्या बँडस्टँड परिसरात फिरत होते. त्यातील एक आरोपी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. त्यामुळे याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.