उरुग्वे | 16 ऑक्टोबर 2023 : माजी ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धक शेरिका डी अरमासचं निधन झालं आहे. तिने 2015 मध्ये ‘मिस वर्ल्ड’ या अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत उरुग्वेचं प्रतिनिधित्व केलं होतं. शेरिकाची सर्वाइकल कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. 13 ऑक्टोबर रोजी तिचं निधन झालं. शेरिकाने कॅन्सरसाठी किमोथेरपी आणि रेडियोथेरपीसुद्धा घेतली होती. शेरिकाच्या निधनानंतर जगभरातून सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
शेरिकाचा भाऊ मयक डी अरमास याने सोशल मीडियावर बहिणीसाठी भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘नेहमी उंच भरारी घे, छोटी बहीण’, असं त्याने लिहिलं आहे. तर ‘मिस युनिव्हर्स उरुग्वे 2022’ कार्ला रोमेरोने शेरिकाला सर्वांत सुंदर महिला असल्याचं म्हटलंय. ‘या जगासाठी ती फारच वेगळी व्यक्ती होती. मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत जितक्या महिलांना भेटले, त्यापैकी ती सर्वांत सुंदर होती’, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. तर ‘मिस उरुग्वे 2021’ लोला डे लॉस सेंटॉसने शेरिकाला श्रद्धांजली वाहताना लिहिलं, ‘मला तुझी खूप आठवण येईल. केवळ तू मला दिलेल्या पाठिंब्यासाठीच नाही तर तुझं प्रेम, तुझा आनंद आणि कायम माझी साथ दिल्याबद्दल.’
26 वर्षीय शेरिकाने 2015 मध्ये चीनमध्ये आयोजित करण्यात आलल्या ‘मिस वर्ल्ड’ या सौंदर्यस्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ती टॉप 30 स्पर्धकांमध्ये पोहोचू शकली नव्हती. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत शेरिका म्हणाली होती, “मला नेहमीच मॉडेल बनायचं होतं. मग ते ब्युटी मॉडेल असो किंवा जाहिरातीसाठी मॉडेल किंवा कॅटवॉक मॉडेल. फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते. ही स्पर्धा खूप आव्हानात्मक आहे, मात्र त्यात सहभागी झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे.”
शेरिकाने तिचा मेकअप ब्रँडसुद्धा लाँच केला होता. शे डी अरमास स्टुडिओ या नावाने ती केस आणि पर्सनल केअरशी संबंधित प्रॉडक्ट्स विकायची. याशिवाय कॅन्सर पीडित मुलांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या फाऊंडेशनसाठीही ती काम करत होती.