यांना पकडून मारलं पाहिजे..; शाहरुख, अक्षय, अजयवर भडकले मुकेश खन्ना
'शक्तीमान' या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. यांना पकडून मारलं पाहिजे, असं ते थेट म्हणाले. नेमकं प्रकरण काय आहे, ते जाणून घेऊयात..
अभिनेता अक्षय कुमारला 2022 मध्ये पानमसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगनंतर त्याने जाहीर माफीसुद्धा मागितली होती. त्याचप्रमाणे भविष्यात अशा पद्धतीच्या जाहिराती करणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. अक्षयने जरी पानमसाल्याच्या जाहिरातीतून माघार घेतली असली तरी प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. ‘शक्तीमान’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करणाऱ्या मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना फटकारलं आहे. अशा जाहिराती करणारा अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना पकडून मारलं पाहिजे, असं ते थेट म्हणाले.
मुकेश खन्ना भडकले
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश यांना पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींबद्दल काय वाटतं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते स्पष्ट म्हणाले, “मला विचारत असाल तर मी म्हणेन, यांना पकडून मारलं पाहिजे. मी तर अक्षय कुमारला सुनावलंसुद्धा होतं. आरोग्याला इतका जपणारा माणूस म्हणतोय ‘आदाब’. अजय देवगण पण म्हणतो ‘आदाबा’. आता तर शाहरुख खाननेही सुरू केलंय. अशा जाहिराती बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तुम्ही लोकांना काय शिकवताय? ते म्हणतात आम्ही पान मसाला विकत नाही, त्यात सुपारी आहे असं सांगतात. पण ते काय करतायत, हे त्यांना नीट ठाऊक आहे.”
शाहरुख, अक्षय, अजयला सुनावलं
“जेव्हा तुम्ही किंगफिशरची जाहिरात करता, तेव्हा त्याचा अर्थ होतो की तुम्ही किंगफिशर बीअर विकत आहात. प्रत्येकाला ही गोष्ट माहीत असते. याला भ्रामक जाहिरात म्हणतात. हे सेलिब्रिटी अशा प्रकारच्या जाहिराती का करतात? त्यांच्याकडे पैसा नाही का? मी त्यांना सांगितलंय की अशा जाहिराती करू नका, तुमच्याकडे खूप पैसा आहे. काहींनी जाहिरातीतून माघार घेतली. अक्षय कुमार हा त्यापैकीच एक आहे. माझ्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनीसुद्धा माघार घेतली आहे. पण आजवर अशा जाहिरातींमागे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही लोकं एकमेकांवर रंग उधळून म्हणतात ‘केसरियाँ जुबान. म्हणजे तुम्ही लोकांना गुटखा खाण्यास प्रोत्साहन देताय”, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार या तिघांची पानमसाल्याची जाहिरात व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी वाढती ट्रोलिंग पाहून अक्षय कुमारने जाहीर माफी मागितली होती. त्याचप्रमाणे भविष्यात अशा जाहिराती करणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.