श्रीनगर : जी-20 राष्ट्रगटाची पर्यटनविषयक परिषद जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर इथं सोमवारपासून सुरू झाली. यावेळी RRR फेम अभिनेता रामचरणच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं. सोमवारी पार पडलेल्या जी-20 वर्किंग ग्रुपच्या तिसऱ्या बैठकीत रामचरणने भाग घेतला होता. या संमेलनात तो चित्रपट पर्यटन समितीचा सदस्य म्हणून उपस्थित होता. रामचरणने RRR या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ देशभरातच नाही तर संपूर्ण जगभरात लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार पटकाविला. त्यानंतर आता जी-20 समिटमध्ये रामचरणच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यावेळी रामचरणने काश्मीरबाबत केलेलं वक्तव्यसुद्धा चर्चेत आलं आहे.
“काश्मीर ही अशी जागा आहे, जिथे मी 1986 पासून येतोय. गुलमर्ग आणि सोनमर्ग याठिकाणी माझ्या वडिलांनी बरेच शूटिंग केले आहेत. 2016 मध्ये याच ऑडिटोरियममध्ये मी शूटिंगनिमित्त आलो होतो. ही जागा जादुई आहे. काश्मीरमध्ये आल्यानंतर मनात आनंदाची वेगळीच भावना येते. काश्मीर सर्वांचं लक्ष वेधून घेतं”, असं तो म्हणाला.
#WATCH | Kashmir is that kind of a place, I have been coming here since 1986, my father shot extensively here in Gulmarg and Sonamarg. I’ve shot in this auditorium in 2016. This place has something magical, it is such a surreal feeling coming to Kashmir, it draws the attention of… pic.twitter.com/jtHyp9OdVr
— ANI (@ANI) May 22, 2023
या समिटमध्ये रामचरणने ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स केला. या प्रसिद्ध गाण्यावर त्याच्यासोबत कोरियाच्या राजदूतांनीही ठेका धरला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रामचरण आणि कोरियाचे राजदूत ‘नाटू नाटू’ची लोकप्रिय स्टेप करताना दिसत आहेत.
RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. यामध्ये रामचरण, ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.
नाटू नाटू गाण्याने ऑस्करसोबतच प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. ‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.