मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले. 2023 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 चित्रपटांमध्ये ‘गदर 2’चा समावेश आहे. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘गदर 2’ कधी आणि कुठे प्रदर्शित होणार याबद्दलची माहिती समोर आली आहे.
सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने देशभरात 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’चा सीक्वेल आहे. विशेष म्हणजे ‘गदर’चा पहिला भागसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता. तब्बल 22 वर्षानंतर अनिल शर्मा यांनी ‘गदर 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणला. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर 2’ ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 6 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
‘गदर 2’च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर होतास ट्विटरवर #Gadar2OnZEE5 हॅशट्रॅग ट्रेंड होऊ लागला आहे. ‘गदर 2’ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. शाहरुख खानच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘पठाण’ या चित्रपटालाही त्याने मागे टाकलं आहे. या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 524.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ‘पठाण’ने 524.53 कोटी रुपये कमावले होते. ‘गदर 2’ या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्यासोबतच उत्कर्ष शर्माचीही मुख्य भूमिका आहे. उत्कर्ष हा दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे. 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ या चित्रपटातसुद्धा त्याने सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली होती.
मुंबई- 143.30 कोटी रुपये दिल्ली-युपी- 125.29 कोटी रुपये पूर्व पंजाब- 64.40 कोटी रुपये सीपी- 27 कोटी रुपये सीआय- 16.98 कोटी रुपये राजस्थान- 27.07 कोटी रुपये मैसूर- 21.26 कोटी रुपये पश्चिम बंगाल- 19.27 कोटी रुपये बिहार-झारखंड- 21.82 कोटी रुपये आसाम- 10.63 कोटी रुपये ओडिसा- 8.80 कोटी रुपये तमिळनाडू आणि केरळ- 2.93 कोटी रुपये