Gadar 2 | सनी देओलच्या ‘गदर 2’मधील 5 खटकणाऱ्या गोष्टी; सीक्वेलमध्ये नाही 22 वर्षांपूर्वींची ‘ती’ खास बात
'गदर' या चित्रपटाशी अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे तितक्याच ताकदीने सीक्वेलमध्ये कथा मांडण्यात येईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. काहींच्या मते, हा सीक्वेल त्या अपेक्षांना पूर्ण करत नाही. 'गदर 2' या चित्रपटातील पाच खटकणाऱ्या गोष्टी कोणत्या, ते पाहुयात..
मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ हा चित्रपट अखेर आज (11 ऑगस्ट) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 20 लाख तिकिटं विकली गेली आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर अनिल शर्मा यांच्या ‘गदर : एक प्रेम कथा’चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र सुरुवातीचे शोज पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘गदर’ या चित्रपटाशी अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे तितक्याच ताकदीने सीक्वेलमध्ये कथा मांडण्यात येईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. काहींच्या मते, हा सीक्वेल त्या अपेक्षांना पूर्ण करत नाही. ‘गदर 2’ या चित्रपटातील पाच खटकणाऱ्या गोष्टी कोणत्या, ते पाहुयात..
‘गदर 2’ या चित्रपटातील 5 खटकणाऱ्या गोष्टी-
- ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटातील सनी देओलचा हँडपंपचा सीन आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आजही त्या सीनची चर्चा होते. मात्र ‘गदर 2’मध्ये दाखवण्यात आलेला हँडपंपचा सीन पाहून हसू अनावर होतं. काही सीन्समध्ये तथ्य नसल्याने चित्रपटाचं कथानक कमकुवत वाटू लागतं.
- ‘गदर’मधील डायलॉग्स तगडे होते, म्हणूनच तो बॉक्स ऑफिसवर आणि नंतरच्या काळात सोशल मीडियावर गाजला. मात्र ‘गदर 2’मधील मोजके संवाद सोडता फारसे प्रभावित करणारे डायलॉग्स नाहीत.
- चित्रपटाच्या पहिल्या काही भागात बराच वेळ सनी देओल दिसत नाही. तारा सिंगशिवाय चित्रपट प्रभावी बनवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी उत्कर्ष उत्तमरित्या पार पाडू शकत नाही. सनी देओल बराच वेळ सीनमध्ये नसल्याने कथा रटाळवाणी वाटू लागते.
- या चित्रपटाची कथा 1971 च्या काळाची दाखवण्यात आली आहे. मात्र त्याला दिलेलं ट्रिटमेंट हे खूपच जुनाट आणि आऊटडेटेड वाटू लागतं. सनी देओलशिवाय चित्रपटात कोणाचंच अभिनय प्रभावी वाटत नाही.
- ‘गदर : एक प्रेम कथा’नंतर देशभक्तीच्या भावनेवरून बरेच चित्रपट बनवण्यात आले. भारत-पाकिस्तानचा मुद्दा असूनही देशभक्ती जागृत करणारा भाग या सीक्वेलमध्ये कमकुवत वाटतो. चित्रपटातील नव्या गाण्यांमध्येही विशेष दम नाही. जी जुनी गाणी पुन्हा समाविष्ट करण्यात आली आहेत, तिच ऐकायला चांगली वाटतात.