Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी गोडसे’ चित्रपटात ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता गोडसेच्या भूमिकेत; पहा ट्रेलर
राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे- एक युद्ध'चा ट्रेलर प्रदर्शित; नेटकरी म्हणाले 'अंगावर काटा आणणारा ट्रेलर'
मुंबई: राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ (Gandhi Godse Ek Yudh) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या टीझरची चर्चा होती. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. महात्मा गांधी आणि नुथराम गोडसे यांच्या विचारधारेतील युद्धाची झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. अभिनेते दीपक अंतानी यामध्ये गांधींच्या भूमिकेत आहेत. तर मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात गोडसेची भूमिका साकारतोय.
गांधी आणि गोडसे यांच्या विचारधारेतील युद्धासोबतच प्रेक्षकांना या चित्रपटात स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचं विश्व पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिशा संतोषी पदार्पण करत आहे. तिच्या भूमिकेचीही झलक या ट्रेलरमध्ये पहायला मिळते.
गोडसेच्या भूमिकेविषयी काय म्हणाला चिन्मय मांडलेकर?
‘गांधी गोडसे- एक युद्ध’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान चिन्मय त्याच्या भूमिकेबद्दल म्हणाला, “सरांनी मला भेटायला बोलावलं, तेव्हा 10-15 मिनिटं आमच्यात चर्चा झाली. त्यांनी मला विचारलं की, भूमिका करशील का? मला काही कल्पनाच नव्हती. मी विचारलं की कोणती भूमिका साकारायची आहे? तर ते म्हणाले गोडसे. मला वाटलं त्यानंतर काही ऑडिशन्स होतील आणि मग निर्णय होईल. मात्र त्यांनी माझ्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच केला होता.”
“राजकुमार संतोषी यांचा चाहता म्हणून मी या चित्रपटासाठी खूप खुश आहे. कारण बऱ्याच वर्षांनी मला त्यांचा चित्रपट अनुभवता येणार आहे”, अशीही भावना त्याने व्यक्त केली.
पहा ट्रेलर
चिन्मयने याआधी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दहशतवाद्याची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याच्या जबरदस्त अभिनयकौशल्याचं कौतुक प्रेक्षक-समिक्षकांकडून झालं होतं.
हा चित्रपट येत्या 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 25 जानेवारी रोजी शाहरुख खानचा ‘पठाण’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन भिन्न विषयांच्या चित्रपटांची टक्कर पहायला मिळणार आहे.