मुंबई | 19 जुलै 2023 : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं १५ जुलै रोजी निधन झालं. वयाच्या ७७ व्या वर्षी रवींद्र महाजनी यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांचं निधन का झालं? ते पुण्यात एकटे का राहत होते? असे अनेक प्रश्न रवींद्र यांच्या निधनानंतर उपस्थित करण्यात आले. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. फक्त चाहतेच नाही तर, संपूर्ण सिनेविश्वाला रविंद्र महाजनी यांच्या निधनानंतर मोठा धक्का बसला आहे. रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. रवींद्र महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. रवींद्र यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण आता रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याच्या एका सोशल मीडियापोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
वडिलांच्या निधनानंतर गश्मीर याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘अभिनेता कायम अभिनेता राहतो… मी आणि माझ्या कुटुंबियांनी या प्रकरणावर मौन बाळगणं पसंत केलं. अम्ही शांत आहोत म्हणून अनेक जण द्वेष करत आहेत… आम्हाला वाईट बोलत आहेत… पण आम्ही त्याचं देखील स्वागतच करतो…’
पुढे गश्मीर म्हणाला, ‘आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला शांती लाभो… ओम शांती… ते माझे वडील होते. माझ्या आईचे पती होते… तुमच्या सर्वांपेक्षा जास्त आम्ही त्यांना ओळखतो.. भविष्यात येग्य वेळ आल्यानंतर मी यावर नक्कीच बोलेल..’ असं गश्मीर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला आहे…
सांगायचं झालं तर, रवींद्र महाजनी पुण्यात ऐकटेच राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा गश्मिर महाजनी मुंबईत राहतात. रवींद्र महाजनी राहत असलेल्या सदनिकेतून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले होते..
मराठी सिनेसृष्टीतील रुबाबदार, देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी यांची ओळख होती. १९७५ ते १९९० या काळात यांनी मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. त्यांनी केलेले सिनेमेही चांगलेच गाजले. मुंबईचा फौजदार, देवता, झुंज, आराम हराम आहे. लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, गोंधळात गोंधळ आदी सिनेमे चांगलेच गाजले. तर बेलभंडार आणि अपराध मीच केला ही त्यांची नाटकेही गाजली.