काय ते थर्ड क्लास…; ‘बिग बॉस’बद्दल प्रश्न विचारणाऱ्यावर भडकला गश्मीर महाजनी
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो आहे. अनेकजण हा शो पाहत असले तरी तो न आवडणाऱ्यांचीही संख्या जास्त आहे. एका युजरने अभिनेता गश्मीर महाजनीला या शोबद्दल प्रश्न विचारला असता, त्याने त्याला चांगलंच सुनावलंय.
‘बिग बॉस’ या शोचे असंख्य चाहते आहेत. मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड अशा विविध भाषांमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सध्या हिंदी भाषेतील बिग बॉसचा अठरावा सिझन सुरू आहे. अभिनेता सलमान खान याचं सूत्रसंचालन करतोय. अनेकांना हा शो आवडत असला तरी असेही काहीजण आहेत ज्यांची त्याला नापसंती आहे. अभिनेता गश्मीर महाजनीला नुकत्याच एका नेटकऱ्याने ‘बिग बॉस 18 ‘मधील एका स्पर्धकाबद्दल विचारलं असता, त्याचा पारा चढला. संबंधित युजरला त्याने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गश्मीरने नुकतंच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने नेटकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली. मात्र बिग बॉसचा प्रश्न विचारताच गश्मीरने युजरला सुनावलं.
एका युजरने गश्मीरला विचारलं, ‘बिग बॉस 18 मधील करणवीरला तुमचा पाठिंबा आहे का?’ त्यावर उत्तर देताना गश्मीर लिहिलं, ‘अहो, तुम्ही मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघता का ते पहिलं सांगा. काय ते थर्ड क्लास बिग बॉस, काय त्याला सपोर्ट करता.’ करणवीर मेहरा हा बिग बॉसच्या अठराव्या सिझनमधील स्पर्धक असून सोशल मीडियावर तो खूप चर्चेत असतो. बिग बॉसचा यंदाचा सिझन तोच जिंकेल, अशी शक्यतता प्रेक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.
याच सेशनदरम्यान गश्मीरने अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या वादावरही प्रतिक्रिया दिली. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. त्यानंतर प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आपापसांतील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, असं तिने म्हटलं होतं. याप्रकरणी प्राजक्ताच्या बाजूने काही बोलशील का, असा प्रश्न विचारल्यावर गश्मीरने लिहिलं, ‘मला संपूर्ण प्रकरण माहीत नाही कारण मी सध्या चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला इतकंच माहीत आहे की प्राजक्ता ही सक्षम, स्वतंत्र आणि स्वत:च्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे… आणि त्यासाठी मी तिचा खूप आदर करतो.’ प्राजक्ता आणि गश्मीरने ‘फुलवंती’ या चित्रपटात एकत्र काम केलंय.