मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौहरने केली मोठी सजावट; पण ऐनवेळी बीएमसी कर्मचारी आले अन्..

'बिग बॉस' फेम अभिनेत्री गौहर खानच्या मुलाचा पहिला वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये या बर्थडे पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पार्टी सुरू होण्यापूर्वीच डेकोरेशनवरून मोठा वाद निर्माण झाला होता.

मुलाच्या वाढदिवसानिमित्त गौहरने केली मोठी सजावट; पण ऐनवेळी बीएमसी कर्मचारी आले अन्..
Gauahar Khan and Zaid Darbar
Image Credit source: Instagram
| Updated on: May 10, 2024 | 2:24 PM

अभिनेत्री गौहर खान आणि तिचा पती झैद दरबार यांनी नुकताच त्यांचा मुलगा झिशानचा पहिला वाढदिवस साजरा केला. मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ‘जंगल थीम’नुसार सजावट करत मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र ही बर्थडे पार्टी सुरू होण्याआधीच त्याला गालबोट लागलं. मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलमध्ये गौहर आणि झैदने त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत येणाऱ्या पाहुण्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी गेटवर ‘जंगल थीम’चाच मोठा गेट बांधण्यात आला होता. मात्र ऐनवेळी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या गेटवर बुलडोजर चढवला.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्टी ज्या ठिकाणी होती, तिथे बाहेर फुटपाथवर हा गेट बांधल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो तातडीने काढण्यास सांगितलं होतं. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आणि पार्टीच्या आयोजकांनी तो गेट काढण्यास नकार दिला. अखेर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला आणि त्यानंतर बीएमसीने तो गेट तोडला. मुलाच्या वाढदिवशी आणखी काही भांडण होऊ नये यासाठी अखेर झैदने मध्यस्ती केली आणि त्याने बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचं काम करू दिलं.

झिशानच्या पहिल्या वाढदिवसाला गौहरने टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केलं होतं. माही विज, हिना खान, डेबिना बॅनर्जी, पंखुडी अवस्थी हे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी पार्टीला उपस्थित होते. पार्टीच्या सुरुवातीलाच बीएमसीकडून सजावटीबाबत कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे अनेकांची निराशा झाली. मात्र गौहरच्या पतीने वेळीच समंजसपणा दाखवत वादाला तिथेच पूर्णविराम दिला. या घटनेबाबत अद्याप गौहर किंवा झैदकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

‘बिग बॉस 7’ची विजेती गौहर खानने 25 डिसेंबर 2020 रोजी संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर 2022 मध्ये गौहरने मुलाला जन्म दिला. गौहर आणि झैदची पहिली भेट मुंबईतील एका दुकानात झाली होती. त्यानंतर झैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. तेव्हापासून हे दोघं हळूहळू एकमेकांशी बोलू लागले. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली.