महाराष्ट्र गाजवणाऱ्या दोन नृत्यांगना एकाच मंचावर; गौतमी पाटीलवर भारी पडली माधुरी पवार
हडपसर इथल्या एका कॅफेच्या उद्घाटनासाठी माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींना आमंत्रित करण्यात आलं होतं. माधुरी आणि गौतमी या दोघींच्याही अदा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. तसंच दोघींची नृत्य सादर करण्याची शैलीदेखील वेगळी आहे.
हडपसर | 9 ऑगस्ट 2023 : सबसे कातील गौतमी पाटील म्हणून गौतमी पाटील घराघरात लोकप्रिय आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची झुंबड उडते. गौतमीला टक्कर देणारी महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध नृत्यांगना म्हणजे माधुरी पवार. महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रम गाजवण्यात या दोघी अग्रेसर आहेत. अभिनेत्री माधुरी पवार आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांनी त्यांच्या नृत्यांतून जनतेची मनं जिंकली आहेत. दोघींचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत या दोघींना चाहत्यांनी वेगवेगळ्या मंचावर पाहिलं आहे. आता पहिल्यांदाच या दोघी एकत्र आणि एकाच मंचावर दिसल्या आहेत.
हडपसर इथल्या एका कॅफेच्या उद्घाटनासाठी माधुरी पवार आणि गौतमी पाटील या दोघींना आमंत्रित करण्यात आलं होतं. माधुरी आणि गौतमी या दोघींच्याही अदा एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. तसंच दोघींची नृत्य सादर करण्याची शैलीदेखील वेगळी आहे. दोघींचीही क्रेझ जास्त असली तरी या कार्यक्रमात गौतमीच्या डीजे शो वर माधुरीची मराठमोळी लावणी भारी पडली.
झी युवा वाहिनीवरील ‘अप्सरा आली’ या डान्स रिॲलिटी शोची विजेती म्हणून माधुरीने तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने यश कमावलं. स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचं स्थान निर्माण केलं. आपल्या दिलखेचक अदांनी लावणी सादर करणारी माधुरी ही अभिनेत्रीसुद्धा आहे. तर एकेकाळी ऑर्केस्ट्रामध्ये अदाकारा म्हणून काम करणारी गौतमी आज सर्वांना मागे टाकून पुढे गेली आहे. एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. गौतमी पाटील आणि कार्यक्रम यशस्वी होणारच हे जणू आता समीकरण झालं आहे. त्यामुळे गौतमी जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात गर्दी होते. काही वेळा तर तिच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी लाठीमारही करावा लागतो.
View this post on Instagram
माधुरी पवार एका मुलाखतीत याविषयी व्यक्त झाली होती. “माझ्या 15 वर्षाच्या कार्यकाळात माझ्या कार्यक्रमात एकदाही हुल्लडबाजी, धक्काबुकी झाली नाही. मी करीत असलेल्या नृत्यांना प्रेक्षकही प्रतिसाद देतात. अनेकजण कार्यक्रमानंतर भेट घेऊन कलेचं कौतुक करतात. एखाद्याकडेच जर आक्षेप घेऊन बोट दाखवलं जात असेल तर आपण कुठे चुकतोय का? हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. चुकीचं होत असेल तर बदलावं. योग्य असेल तर तसंच सुरु ठेवावं. लोककला छान आहे. जिवंत रहायला हवी,” असं ती म्हणाली होती.
सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषत: तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. गौतमी अश्लील अदा करत असल्याची टीका झाली होती. त्यावेळी तिने स्वत:हून माफीही मागितली होती. त्यानंतर तिने अश्लील हावभाव वाटणाऱ्या स्टेप्स करणं टाळण्यास सुरुवात केली.