‘सबसे कातिल गौतमी पाटिल..’ या नावाची वेगळी ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग असलेली गौतमी पाटील ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गौतमीच्या डान्सवरून अनेकदा टीकासुद्धा झाली. मात्र तरीही तिचा चाहतावर्ग कमी झाला नाही. तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होते. आता हीच गौतमी पाटील ‘द महाराष्ट्र फाइल्स’ या आगामी चित्रपटातील एका गाण्यात झळकणार आहे. संजीवकुमार राठोड यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. गौतमीला सहसा पारंपरिक वेशभूषेतच पाहिलं गेलं. मात्र आता या गाण्यात तिचा वेगळा लूक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटातील एका हिंदी गाण्यावर गौतमी थिरकणार आहे. या गाण्यात ती डान्सबार गर्लच्या लूकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट बिग बजेट असून त्यात कलाकारांची मोठी फौज पहायला मिळणार असल्याचं कळतंय. ‘द महाराष्ट्र फाइल्स’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच दिवशी 850 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे.
चित्रपटात मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी,नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशिल राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवी धनवे, प्रमोद गायकवाड यांच्या भूमिका आहेत. तर नितीन-अजित, सिदार्थ कश्यप, संजय लोंढे यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीत दिलं आहे. या चित्रपटातील गाणी अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, साक्षी होळकर, अमरिश आणि शांताबाई फेम संजय लोंढे यांनी गायली आहेत.
हा चित्रपट सामाजिकरित्या वंचित आणि दुर्बल घटकाच्या समस्यांवर आधारीत आहे. या चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांच्यानुसार हा चित्रपट म्हणजे ‘कॉमन सिटीझन्स फाइल’ आहे. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पार्टीचा अंजेडा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. सर्वसामान्य शेतकरी, विधवा महिला, विद्यार्थी यांची फाइल असून सर्व राजकिय पक्षांनी, सर्व सरकारी व प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकत्यांनी आवर्जून पहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.