Genelia D’Souza | ‘दररोज माझी मराठी..’; सासूसाठी जिनिलिया देशमुखची खास पोस्ट
अभिनेत्री जिनिलिया डिसूझा देशमुखने तिच्या सासूसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. रितेश देशमुखची आई वैशाली देशमुख यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त जिनिलियाने ही पोस्ट लिहिली आहे.
मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात चांगला ताळमेळ साधताना दिसते. सासरकडच्या मंडळींशी जिनिलियाचे खूप चांगले संबंध आहेत. त्यातही विशेषकरून सासू वैशाली देशमुख यांच्याकडून ती दररोज नवनवीन गोष्टी शिकत असते. आज 10 ऑक्टोबर रोजी रितेशच्या आईचा वाढदिवस आहे. यानिमित्त जिनिलियाने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने वैशाली यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत जिनिलिया आणि रितेशची दोन मुलंसुद्धा दिसत आहेत.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये जिनिलियाने लिहिलं, ‘प्रेमळ आई.. एक प्रगतिशील महिला कशी असते, हे मला शिकवण्यासाठी धन्यवाद, मला आपल्यातलंच समजून प्रेम करण्यासाठी धन्यवाद, दररोज माझी मराठी भाषा सुधारण्यासाठी धन्यवाद आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझी आई होण्यासाठी धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुमच्यासारखं दुसरं कोणी असूच शकत नाही.’ जिनिलिया दरवर्षी सासूंच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित त्यांना शुभेच्छा देते.
सासूसाठी जिनिलियाची खास पोस्ट
View this post on Instagram
जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे. जिनिलियाने मध्यंतरीच्या काळात ‘जय हो’ आणि ‘फोर्स 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्येच तिने मुख्य भूमिका साकारली. कुटुंबाकडे अधिक लक्ष देता यावं यासाठी ग्लॅमर विश्वातून ब्रेक घेतल्याचं तिने याआधीच्या एका मुलाखतीतही स्पष्ट केलं होतं.
जिनिलिया लवकरच ‘ट्रायल पिरीअड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौटुंबिक नात्यांविषयी भाष्य करणारा हा चित्रपट आहे. यामध्ये ती एकल मातेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात जिनिलियासोबतच शक्ती कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव आणि झिदान ब्राझ यांच्या भूमिका आहेत.