शाहनवाजशी लग्नानंतर देवोलीनाचं धर्मांतर? अखेर सत्य आलं समोर
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने 2022 मध्ये शाहनवाज शेखशी आंतरधर्मीय लग्न केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देवोलीना याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नानंतर तिने धर्मांतर केलं का, याचंही उत्तर देवोलीनाने दिलंय.

‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. देवोलीना तिचा पती शाहनवाज शेखसोबत पारस छाबडाच्या पॉडकास्ट मुलाखतीत पाहुणी म्हणून पोहोचली होती. या मुलाखतीत दोघांनी आंतरधर्मीय लग्न, कुटुंबीयांचा विरोध, ऑनलाइन ट्रोलिंग याविषयी गप्पा मारल्या. यावेळी देवोलीनाला धर्मांतराविषयीही प्रश्न विचारण्यात आला होता. शाहनवाजशी लग्न केल्यानंतर देवोलीनाने इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या चर्चा होत्या. त्यावर तिने उत्तर दिलं आहे.
देवोलीना आणि शाहनवाज यांनी 2022 मध्ये लग्न केलं. पहिल्या लॉकडाऊनदरम्यान हे दोघं एकमेकांना भेटले होते. लग्नासाठी मीच त्याला विचारलं होतं. आम्ही कोर्ट मॅरेज केलं. “आमच्या लग्नासाठी कुटुंबीयांची परवानगी घ्यायला थोडा वेळ लागला. त्यामागे अर्थात धर्म हे कारण होतं. आंतरधर्मीय लग्नाच्या वेळी हे सर्वसामान्य आहे. आमच्या कुटुंबीयांना आम्ही खूप समजावलं, काही गोष्टी वरखाली झाल्या पण अखेर त्यांनी होकार दिला. जेव्हा तुम्ही ठरवता की या व्यक्तीसोबत मला माझं आयुष्य जगायचंय, तेव्हा तुम्ही सर्व प्रयत्न करता”, असं शाहनवाज म्हणाला.




View this post on Instagram
आंतरधर्मीय लग्नाविषयी देवोलीना म्हणाली, “होय, माझ्या कुटुंबीयांना समस्या होती. आजही आंतरधर्मीय लग्नाला परवानगी नाही. आई, भाऊ आणि जवळपास इतर सर्व कुटुंबीयांचा नकार होता. फक्त मावशी आणि माझ्या मोठ्या काकांनी पाठिंबा दिला होता. माझी आई लग्नालाही येणार नव्हती. परंतु नंतर तिचं मन बदललं.” देवोलीना हिंदू आणि शानवाज मुस्लीम असल्याने धर्मांतराचा किंवा एकमेकांवर दुसरा धर्म लादण्याचा कधी प्रश्न आला का, यावरही दोघं मोकळेपणे व्यक्त झाले.
“कोणताही धर्म पाळण्याबाबत आम्ही कधीच एकमेकांना बळजबरी केली नाही. मला तुझा धर्म पाळावा लागेल किंवा तुला माझा धर्म पाळावा लागेल अशी गोष्टच आमच्यात नव्हती. आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा एकमेकांना माहीत होतं की मी हिंदू आणि तो मुस्लीम आहे. आमचं नातं कसं असेल आणि आम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करतोय, याची आम्हाला स्पष्ट जाणीव होती. अनेकजण रिलेशनशिपमध्ये येतात, परंतु धर्माच्या मुद्द्यामुळे ते लग्न करत नाहीत. जेव्हा तुम्ही दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीवर प्रेम करता, तेव्हा तुम्ही निर्णय घेताना मोकळा विचार करायला हवं. मी याबाबत स्पष्ट होते की लहानपणापासून मी जी संस्कृती पाळते, तेच पुढे पाळणार. तोसुद्धा त्याच्या संस्कृती आणि परंपरेबद्दल स्पष्ट होता. त्यामुळे आम्ही कधीच एकमेकांना कोणता धर्म पाळण्यासाठी बळजबरी केली नाही. तुला हिंदू धर्म पाळावा लागेल किंवा तुला इस्लाम धर्म पाळावा लागेल, अशी चर्चाच आमच्यात कधी झाली नाही. जन्म, मृत्यू आणि लग्न या गोष्टी आधीच ठरलेल्या असतात आणि आमचं एकत्र येणं हे लिहिलेलंच होतं”, असं देवोलीनाने स्पष्ट केलं.