Haryana | हरयाणा हिंसाचारावर गोविंदाच्या ट्विटची चर्चा; अखेर अभिनेत्याचं स्पष्टीकरण, ‘मी एखाद्या पक्षात प्रवेश..’
हरियाणाच्या हिंसाचारावर अभिनेता गोविंदाचं एक ट्विट बुधवारी सोशल मीडियावर चर्चेत आलं. गोविंदाच्या ट्विटर अकाऊंटवरून हिंसाचाराबद्दल केलेल्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोलिंग केली. आता गोविंदाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे की हरियाणामधील हिंसाचाराबद्दल ट्विट त्याने केलं नव्हतं.
मुंबई | 3 ऑगस्ट 2023 : हरियाणामध्ये सोमवारपासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारामध्ये मृतांची संख्या वाढून बुधवारी सहा इतकी झाली. नुहमधील परिस्थिती नियंत्रणात आली असून परिस्थिती सामान्य झाली आहे. मात्र अन्य काही ठिकाणी हिंसाचाराच्या काही घटना घडल्याचं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं. तसंच हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू आहे. हरियाणाच्या हिंसाचारावर अभिनेता गोविंदाचं एक ट्विट बुधवारी सोशल मीडियावर चर्चेत आलं. गोविंदाच्या ट्विटर अकाऊंटवरून हिंसाचाराबद्दल केलेल्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोलिंग केली. आता गोविंदाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे की हरियाणामधील हिंसाचाराबद्दल ट्विट त्याने केलं नव्हतं. त्याचं ट्विटर अकाऊंट हॅक करून कोणीतरी ते ट्विट केल्याचं गोविंदा म्हणाला. इतकंच नव्हे तर येत्या निवडणुकांमध्ये मला तिकिट तर मिळणार नाही ना या भीतीने काही लोकांनी असा कट रचल्याचा आरोप त्याने केला आहे.
गोविंदाच्या ट्विटर अकाऊंटवरील हे ट्विट हरियाणामधील मुस्लिम समुदायाच्या लोकांची दुकानं लुटण्यासंदर्भात होता. मात्र या ट्विटच्या कमेंटमध्ये लोकांनी गोविंदाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर अकाऊंटवरून हा ट्विट काढून टाकण्यात आला आणि नंतर गोविंदाने त्याचं ट्विटर अकाऊंटसुद्धा डिलिट केलं. गोविंदाने हरियाणाच्या हिंसाचाराबद्दल लिहिलं होतं, ‘आपण कोणत्या पातळीला आलो आहोत? जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात आणि अशा गोष्टी करतात, त्यांना लाज वाटली पाहिजे. शांतता आणि सुव्यवस्था राखा. आपण डेमोक्रसी आहोत, ऑटोक्रसी नाही.’
View this post on Instagram
हा ट्विट व्हायरल झाल्यानंतर गोविंदाने आता इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने म्हटलंय, “हरियाणाच्या हिंसाचाराबद्दल व्हायरल होत असलेल्या व्हिडीओशी माझा संबंध जोडू नका. मी ते ट्विट नाही केलं. कोणीतरी माझा अकाऊंट हॅक केला होता. त्या अकाऊंटला मी बऱ्याच वर्षांपासून वापरत नव्हतो. माझ्या टीमनेही नकार दिला आहे. मला न विचारता ते असं काही ट्विट करणार नाहीत. मी हे प्रकरण सायबर क्राइमपर्यंत घेऊन जाणार आहे. कदाचित आता निवडणुका येणार आहेत, त्यामुळे एखाद्याने असा विचार केला असेल की मी कोणत्या पक्षाकडून पुढे येऊ नये. म्हणून असं केलं असेल. मी असं कधीच करत नाही.”