अभिनेता गोविंदाची मुलगी टिना अहुजाची नुकतीच एक मुलाखत चर्चेत आली आहे. आई सुनितासोबत ती या मुलाखतीत पोहोचली होती. व्यवसायाने उद्योजिका असलेल्या टिनाने या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र या मुलाखतीत तिने महिलांच्या मासिक पाळीबद्दल जे मत मांडलं, त्याचीच सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. “मुंबई आणि दिल्लीतल्या महिलांनाच मासिक पाळीदरम्यान वेदना होतात. मात्र इतर शहरांमधील महिलांना असा त्रास होत नाही”, असं ती म्हणाली. इतकंच नव्हे तर मासिक पाळीतील वेदना या मानसिक असतात, असंही मत तिने मांडलंय.
‘हॉटलफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत टिना म्हणाली, “मी बहुतेकदा चंदीगडमध्येच राहिले आहे आणि मी असं ऐकलंय की बॉम्बे, दिल्लीतल्या मुलींनाच मासिक पाळीदरम्यान वेदना होतात. सतत समस्यांबाबत बोलणाऱ्या मित्रमैत्रिणींमुळेच आयुष्यातील निम्म्या समस्या उद्भवतात आणि कधीकधी ज्यांना मासिक पाळीत वेदना होतही नसतील, त्यांनासुद्धा ते मानसिकदृष्ट्या जाणवू लागलं. पंजाबमधील आणि इतर छोट्या शहरांमधील महिलांना मासिक पाळी कधी आली आणि रजोनिवृत्ती कधी झाली हेही लक्षात येत नाही. त्यांना काहीच जाणवत नाही.”
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांसाठी टिनाने महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींना कारणीभूत ठरवलंय. याविषयी ती पुढे म्हणाली, “माझं शरीर अत्यंत देशी आहे. मला पाठीचं दुखणं किंवा पाळीदरम्यान वेदना होत नाहीत. पण इथे मी नेहमीच बघते की मुलगी पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांबद्दल बोलत असतात. तुम्ही तूप खा, डाएट सुधारा, गरज नसलेली डाएटिंग सोडून द्या, पुरेशी झोप घ्या.. अशाने सर्व गोष्टी ठीक होतील. डाएटिंगबद्दलच्या वेडामुळेही अनेक मुलींना आरोग्याच्या समस्या जाणवतात.”
यावेळी मुलाखतीत बाजूला बसलेल्या टिनाच्या आईने तिच्या मताशी सहमती दर्शविली. पण त्याचसोबत डाएटमध्ये एखादी गोष्ट समाविष्ट करताना किंवा काढून टाकण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितलं. “नंतर तुम्ही मला दोष देऊ नका की गोविंदाच्या पत्नीने एक चमचा तूप खाण्यास सांगितलं आणि मला हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्या”, असं सुनिता म्हणाली. लहानपणापासून वडील गोविंदा हे माझ्या वजनाविषयी आणि खाण्यापाण्याविषयी अधिक जागरूक असायचे, असंही टिनाने सांगितलं.