पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट; पत्नीने देवीकडे केली प्रार्थना

| Updated on: Oct 03, 2024 | 11:51 AM

मंगळवारी गोविंदा सकाळी 7 वाजताच्या सुमारास विमानाने कोलकात्याला जाणार होता. घरातून निघत असताना तो बंदूक कपाटात ठेवत होता. त्यावेळी हातातून बंदूक खाली पडली आणि बंदुकीतून एक गोळी सुटली. ती गोळी थेट गोविंदाच्या पायाला लागली.

पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट; पत्नीने देवीकडे केली प्रार्थना
Govinda
Follow us on

अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवताना गोविंदाच्या हातून ती खाली पडली. त्याचवेळी त्यातून सुटलेली गोळी ही त्याच्या डाव्या पायाला लागली. यानंतर आयसीयूमध्ये गोविंदावर उपचार सुरू होते. गोविंदाच्या पायातून गोळी काढण्यात आली आणि पायाला 8 ते 10 टाके लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. आता गोविंदाच्या प्रकृतीविषयी दिलासादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला आयसीमधून नॉर्मल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. गोविंदाची मुलगी टिना अहुजाने याविषयीची माहिती दिली.

“बाबांची प्रकृती सुधारतेय. देवाच्या कृपेने त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. सर्वकाही ठीक आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यांना लवकरात लवकर रुग्णालयात डिस्चार्ज मिळेल अशी आशा आहे”, असं टिना म्हणाली. तर दुसरीकडे गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने त्याच्या प्रकृतीसाठी मातेची पूजा केली आहे. आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली आहे. गोविंदा लवकर बरा व्हावा यासाठी सुनीताने घटस्थापनेच्या दिवशी देवीकडे प्रार्थना केली आहे.

हे सुद्धा वाचा

“आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. मी गोविंदासाठी देवीची पूजा केली आहे. आज किंवा उद्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गोविंदाला डिस्चार्ज मिळू शकतो. गोविंदाही नवरात्रौत्सवात देवीची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे त्याला आज डिस्चार्ज मिळाला अशी त्याची इच्छा आहे,” असं सुनीता म्हणाली. गोविंदाला भेटण्यासाठी आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बरेच सेलिब्रिटी रुग्णालयात जात आहेत. अभिनेत्री रवीना टंडन, निर्माता जॅकी भगनानी, दिग्दर्शिक डेव्हिड धवन, राजपाल यादव, शत्रुघ्न सिन्हा यांसारख्या कलाकारांनी रुग्णालयात गोविंदाची भेट घेतली.

“त्याची प्रकृती आता स्थिर आहे. तो ठीक आहे. हा एक अपघात होता. अपघातात जर-तरच्या गोष्टी नसतात. त्याच्यावर उपचार सुरू आहेत”, अशी प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी भेटीनंतर दिली होती. ही प्रतिक्रिया देत त्यांनी या घटनेत घातपाताची किंवा कट-कारस्थानची शक्यता नाकारली आहे. गोविंदाच्या पायाला बंदुकीची गोळी लागलीच कशी, असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला होता. ही गोळी चुकून लागली की यामागे काही वेगळं कारण आहे, असेही प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले होते.