अभिनेता गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. नव्वदच्या दशकात त्याने एकानंतर एक हिट चित्रपटे दिली. गोविंदा फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या चित्रपटांविषयी आणि खासगी आयुष्याविषयी अनेकांना माहित असेलच. गोविंदाच्या आईबद्दल फार क्वचित लोकांना माहित असेल. गोविंदाचं त्याच्या आईवर खूप जीव होता. याविषयी तो अनेक मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाला. गोविंदा स्वत: फार धार्मिक आहे. त्याला अनेकदा पूजा-पाठ करताना पाहिलं गेलंय. मात्र तुम्हाला माहित आहे का, की गोविंदाची आई जन्माने मुस्लिम होती? लग्नानंतर त्या हिंदू बनल्या आणि त्यानंतर अखेरच्या क्षणापर्यंत त्या साध्वी बनून राहिल्या होत्या.
7 जून 1927 रोजी गोविंदाची आई निर्मला देवी यांचा जन्म वाराणसीमध्ये एका मुस्लीम कुटुंबीत झाला होता. लग्नापूर्वी त्यांचं नाव नाजिम असं होतं. मात्र 1941 मध्ये त्यांनी चित्रपट निर्माते अरुण कुमार ओझा यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून निर्मला देवी असं ठेवलं होतं. निर्मला देवी यांना चार मुलं आहेत. कामिनी, कृती कुमार, पुष्पा आनंद आणि गोविंदा अशी त्यांची नावं आहेत. गोविंदाच्या जन्मानंतर निर्मला देवी यांनी संन्यास घेतला आणि साध्वी बनल्या होत्या. 3 जुलै 1998 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
गोविंदाने काही मुलाखतींमध्ये त्याच्या आईचा उल्लेख केला आहे. गोविंदाची पत्नी सुनितानेही अनेकदा सांगितलं की त्याचं आईवर खूप प्रेम होतं. आईच्या निधनानंतर ते कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी जाताना त्यांच्या फोटोचं दर्शन घेऊनच बाहेर पडतात. आजही आईबद्दल बोलताना गोविंदा भावूक होतो.
कॉमर्स डिग्री संपादित केल्यानंतर गोविंदाने चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा वडिलांसमोर बोलून दाखवली होती. 1982 मध्ये ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला अभिनयात आवड निर्माण झाली. 1986 मध्ये त्याने ‘तन बदन’ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘हत्या’, ‘स्वर्ग’, ‘आग’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर 1’, ‘कुली नंबर 1’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.