Govinda | “मी स्वत:लाच कानाखाली मारून..”; चित्रपटांमध्ये काम न करण्याबद्दल गोविंदाचं वक्तव्य चर्चेत
बॉलिवूडचा एक काळ गाजवणारा गोविंदा गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. गोविंदा मोठ्या पडद्यावर कधी झळकणार असा प्रश्न पापाराझींनी विचारला असता त्याने 100 कोटींची ऑफर नाकारल्याचा खुलासा केला.
मुंबई | 20 सप्टेंबर 2023 : अभिनेता गोविंदाने नव्वदच्या दशकात एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र गेल्या काही काळापासून गोविंदा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. गणेश चतुर्थीनिमित्त गोविंदाला त्याची पत्नी आणि मुलासोबत पारंपरिक अंदाजात गणेश दर्शनाला गेल्याचं पहायला मिळालं. यावेळी गोविंदाने पापाराझींसोबत संवाद साधला. चित्रपटांमध्ये कधी झळकणार, असा प्रश्न विचारला असता गोविंदाने 100 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट नाकारल्याचा खुलासा केला.
“मी काम लवकर स्वीकारत नाही. पण लोकांना असं वाटतं की मला कामच मिळत नाही. मला लोकांना हे सांगायला आवडेल की माझ्यावर बाप्पाची खूप कृपा आहे. गेल्या वर्षी मी 100 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट सोडला. आरशासमोर मी स्वत:ला कानाखाली मारून घेत होतो, कारण मी कोणतात प्रोजेक्ट साइन करत नव्हतो. ते मला खूप पैसे द्यायला तयार होते पण मला अशा कोणत्याही भूमिका साकाराच्या नव्हत्या. मी ज्या पद्धतीच्या भूमिका आजपर्यंत साकारल्या आहेत, तशाच भूमिका मला हव्या आहेत. त्याच पातळीचं काम मला हवंय”, असं गोविंदा म्हणाला.
‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर अभिनेत्री अमीषा पटेलने एका मुलाखतीत असा खुलासा केला की ‘गदर’ या चित्रपटासाठी सर्वांत आधी गोविंदाची निवड झाली होती. “झीने सकीनाच्या भूमिकेसाठी माझी निवड केली होती, अनिल शर्मा यांनी नाही. माझ्यासाठी गदर हा चित्रपट नेहमीच सनी देओल आणि झी यांच्याबद्दल राहिला आहे. खरंतर नितीन केणी यांच्यामुळेच मी गदरचा भाग होऊ शकले. अनिल शर्मा यांनी माझ्या जाही ममता कुलकर्णीला निवडलं होतं. अनिल शर्मा यांना तारा सिंगच्या भूमिकेत गोविंदाला घ्यायचं होतं. पण झीने सनी देओलवर शिक्कामोर्तब केला”, असं अमीषाने सांगितलं.
गोविंदाने 11 मार्च 1987 रोजी सुनिता अहुजाशी लग्न केलं. त्यावेळी गोविंदा 24 आणि सुनिता फक्त 18 वर्षांची होती. या दोघांना यशवर्धन हा मुलगा आणि टिना ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा पॉन्झी घोटाळ्यामुळेही चर्चेत होता. ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून गोविंदाची चौकशी होणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. क्रिप्टोच्या नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती. कंपनीने दोन लाख लोकांकडून एक हजार कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओमध्ये या कंपनीचं समर्थन केल्याचा आरोप आहे.