“आमच्या नात्यात मला आता सुरक्षित वाटत नाही..”; गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा
पुरुषांवर विश्वास ठेवू नका, ते सरड्यासारखे रंग बदलतात, असं गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा म्हणाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
अभिनेता गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. त्याच्यासोबत चित्रपट करण्यासाठी दिग्दर्शकांची अक्षरश: रांग लागायची. गोविंदाने करिअरच्या शिखरावर असताना सुनीता अहुजाशी लग्न केलं होतं. लग्नाचं वृत्त त्याने बराच काळ सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता गोविंदासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. लग्नाच्या इतक्या वर्षात गोविंदाकडे आणि नात्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलत गेला, याविषयी तिने सांगितलं. करिअरच्या शिखरावर असताना गोविंदाचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. मात्र अशा परिस्थितीतही कधीच मला असुरक्षित वाटलं नव्हतं, असं सुनीता म्हणाली.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाच्या पत्नीने सांगितलं, “मला आधी आमच्या नात्यात खूप सुरक्षित वाटायचं. पण आता तितकं सुरक्षित वाटत नाही. वयाची साठी ओलांडली की लोकांचं डोकं फिरतं. गोविंदाचं वय साठच्या वर आहे आणि तो कधी काय करेल हे तुम्ही सांगू शकत नाही (हसते).” यावेळी सुनीताला गोविंदाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. जेव्हा त्याचं नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडलं जात होतं, तेव्हा काय वाटायचं, असं विचारलं असताना सुनीता म्हणाली, “उलट मला तेव्हा खूपच सुरक्षित वाटायचं. कारण मला त्याचं वेळापत्रक माहीत होतं. तो कामात इतका व्यग्र होता, ज्यामुळे त्याला अजिबात कशासाठी वेळ मिळायचा नाही. पण त्याच चर्चा जर आता समोर आल्या, तर मी अस्वस्थ होऊ शकते.”
View this post on Instagram
मानवी स्वभावाच्या अनिश्चिततेविषयी सुनीता पुढे मस्करीत म्हणाली, “मी पुन्हा सांगते, कधीच विश्वास ठेवायचो नसतो, पुरुष हा सरड्यासारखा आपला रंग बदलत असते (हसते).” सुनीला आणि गोविंदाने 11 मार्च 1987 रोजी लग्न केलं. या दोघांना टिना ही मुलगी आणि यशवर्धन हा मुलगा आहे. या मुलाखतीत सुनीताने असाही खुलासा केला की बहुतांश वेळी ती आणि गोविंदा वेगवेगळ्या घरात राहतात. कारण गोविंदाला लोकांना जमवून त्यांच्याशी बोलणं आवडत नाही. शिवाय मीटिंग्समुळे गोविंदाला अनेकशा उशीरापर्यंत जागं राहावं लागतं. यामुळे त्याची पत्नी आणि मुलं एका अपार्टमेंटमध्ये राहतात. याच अपार्टमेंटच्या समोरील बंगल्यात गोविंदा राहतो.