हार्दिकसोबत घटस्फोटानंतर मुलासोबत याठिकाणी गेली नताशा; पहा फोटो
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविक यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट जाहीर केला. त्याच्या एक दिवस आधीच नताशा मुलगा अगस्त्यला सोबत घेऊन मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली होती. मुलासोबत नताशा भारताबाहेर गेली आहे.
सोशल मीडियावरील बऱ्याच चर्चांनंतर अखेर गुरुवारी क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविक यांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. गुरूवारी रात्री या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित नेटकऱ्यांना याबद्दलची माहिती दिली. त्याच्या एक दिवस आधी बुधवारी नताशाला मुलगा अगस्त्यसोबत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहिलं गेलं. मुलाला घेऊन नताशा तिच्या मायदेशी परतली आहे. घटस्फोट जाहीर झाल्यानंतर ती इन्स्टाग्रामच्या स्टोरीमध्ये सर्बियामधील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतेय.
घटस्फोटाची पोस्ट-
हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. हार्दिकने यामध्ये लिहिलं, ‘चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्परसंमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. आम्ही एकत्र राहण्याचा खूप प्रयत्न केला आणि नात्याला सर्वकाही दिलं. पण आमच्या दोघांच्या भल्यासाठी हाच निर्णय ठीक असेल असं आम्हाला वाटतं. कुटुंब म्हणून एकत्र राहिल्यानंतर, आनंदाने आणि आदराने एकमेकांचा सहवास अनुभवल्यानंतर हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठीण होतं. अगस्त्य हा आम्हा दोघांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी नेहमीच राहील. आम्ही दोघं मिळून त्याचं संगोपन करू, जेणेकरून त्याच्या आनंदासाठी आम्ही आम्हाला शक्य ते सर्व प्रयत्न करू शकू. या कठीण आणि संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला समजून घ्या अशी विनंती करतो.’
View this post on Instagram
हार्दिक आणि नताशा हे दोघं लॉकडाउनदरम्यान एकमेकांना डेट करू लागले होते. त्यानंतर 31 मे 2020 रोजी त्यांनी लग्न केलं. त्याचवर्षी 30 जुलै रोजी नताशाने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर गेल्या वर्षी हार्दिक-नताशाने पुन्हा लग्न केलं. ख्रिश्चन आणि हिंदू विवाहपद्धतीनुसार त्यांनी सर्व विधी केल्या होत्या.
View this post on Instagram
नताशाने काही दिवसांपूर्वी अचानक सोशल मीडियावरून हार्दिकसोबतचे लग्नाचे फोटो काढून टाकले होते. तेव्हापासून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयानंतरही नताशाने हार्दिकसाठी कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती. तेव्हासुद्धा नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. या चर्चांदरम्यान हार्दिक एकटाच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात दिसला होता.