मुंबई | 8 ऑगस्ट 2023: सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील मुन्नी सर्वांनाच आठवत असेल. मुन्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी हर्षाली मल्होत्री आता मोठी झाली आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर दोन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकताच तिने ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातील गाजलेल्या ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर जबरदस्त डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हर्षालीने स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा सुरू केला आहे. त्यावरही ती विविध व्हिडीओ पोस्ट करत असते. मात्र याच गोष्टीवरून एका युजरने तिला ट्रोल केलंय. हर्षालीवर टीका करताना संबंधित ट्रोलरने तिच्या कुटुंबीयांवरही निशाणा साधला आहे. त्यामुळे हर्षालीसुद्धा चांगलीच चिडली आहे. तिने ट्रोलरला दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘व्हॉट झुमका’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर हर्षालीने तिचा फोटोदेखील शेअर केला. याच फोटोवर एका युजरने कमेंट करत तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर टीका केली. ‘मला एक गोष्ट समजत नाही, लोकांना या मुलीमध्ये नेमकं काय दिसतं? ना लूक आहे, ना अभिनयकौशल्य.. तिला फक्त इतरांना कॉपी करणं जमतं. आधी रुहानिकाला पाहून युट्यूब चॅनल सुरू केलं, त्यानंतर कथ्थक आणि आता जे ती करते, ते सर्व हिला करायचं आहे. हिचं स्वत:चं काही अस्तित्वच नाही. लोकांना कॉपी करणं आणि इतरांबद्दल ईर्षा बाळगणं.. फक्त हेच हिला आणि हिच्या कुटुंबीयांना जमतं. आताच सुधार बहीण.. तुला अभिनय तर काही जमणार नाही’, अशा शब्दांत युजरने हर्षाली आणि तिच्या कुटुंबीयांवर टीका केली.
यावर हर्षालीनेही संबंधित युजरला सडेतोड उत्तर दिलं. तिने लिहिलं, ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही एखाद्याच्या कुटुंबीयांवर टीका करता. यावरूनच तुमची पातळी दिसून येते. समोर येण्याचं धाडस नाही म्हणून फेक अकाऊंटवरून टीका करता. कॉपी करण्याची गोष्ट असेल तर रुहानिकाने कथ्थक, युट्यूब किंवा इतर काही करण्याचा कॉपीराइट विकत घेतला आहे का? कोणी दुसरं या गोष्टी करू शकत नाही का?’
या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी हर्षालीची साथ दिली. अशा टीकाकारांकडे लक्ष देऊ नको, असाही सल्ला काहींनी दिला. त्यावर तिने पुढे लिहिलं, ‘मला काही फरक पडत नाही. मला जे करायचं असेल ते मी करत राहीन. पण कोणाच्याही कुटुंबीयांवर टीका करणं योग्य नाही.’
हर्षाली मल्होत्राला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा स्क्रीन अवॉर्ड आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर अवॉर्ड मिळाला. या चित्रपटाशिवाय तिने ‘कुबुल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.