‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्रीची धमाकेदार एण्ट्री
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत जयदीप-गौरीच्या पुनर्जन्माचा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेच्या विश्वातला हा नवा प्रयोग आहे. ज्या जोडीला प्रेक्षकांचं इतकं भरभरुन प्रेम मिळालं ती जयदीप-गौरीची लोकप्रिय जोडी अधिराज आणि नित्या या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : 17 नोव्हेंबर 2023 | स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचं कथानक 25 वर्षांनी पुढे सरकलं आहे. गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. या नव्या पर्वात नित्या-अभिराजची प्रेमकहाणी कशी फुलणार? कोणती नवी पात्र असणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता सुप्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत धमाकेदार एण्ट्री होणार आहे.
हर्षदा या मालिकेत सरपंचाच्या भूमिकेत दिसतील. सौ. वसुंधरादेवी अहिरराव असं त्यांच्या भूमिकेचं नाव असून आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि हटके अशी ही भूमिका असेल. या भूमिकेविषयी सांगताना हर्षदा म्हणाल्या, “स्टार प्रवाह वाहिनीने माझ्यावर विश्वास ठेऊन नेहमीच नवनव्या भूमिकांसाठी माझी निवड केली आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत मी साकारत असलेली वसुंधरादेवी ही व्यक्तिरेखा खूपच वेगळी आहे. आतापर्यंत मी ज्या भूमिका साकारल्या त्यांच्या पेहरावाची नेहमीच प्रशंसा झालीय. भरजरी साड्या, दागिने ही माझ्या भूमिकेची प्रमुख ओळख बनली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र मी आता साकारत असलेली वसुंधरादेवी हे पात्र याच्या पूर्ण वेगळं आहे.”
View this post on Instagram
“अत्यंत साधी रहाणी असलेल्या वसुंधरादेवीचा गावात मात्र दबदबा आहे. या भूमिकेचं वेगळेपण म्हणजे मी आत्मसात केलेली कोल्हापुरी भाषा. कोल्हापुरवर माझं विशेष प्रेम आहे. प्रेक्षकांनी आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम वसुंधरादेवींनाही मिळेल याची खात्री आहे,” असं त्या पुढे म्हणाल्या.
पुनर्जन्माच्या या कथेत अनेक रहस्यांचाही उलगडा होणारा आहे. सोबतच अनेक नवी पात्रही भेटीला येतील. जयदीप-गौरीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शालिनीचं पुढे काय होणार? लक्ष्मी कुठे असेल? नंदिनी शिर्के पाटील कुठे असतील? नित्या-अधिराजची भेट कशी होणार? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नव्या पर्वातून उलगडतील. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका येत्या 20 नोव्हेंबरपासून नव्या वेळेत म्हणजेच रात्री 10 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.