आंध्रप्रदेश : ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांच्या एका व्हिडीओवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. ओम राऊत आणि क्रितीने बुधवारी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन देवदर्शन केलं. त्यानंतर एकमेकांचा निरोप घेताना ओम राऊत यांनी मंदिरासमोर क्रितीच्या गालावर हलका किस केला. यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. आता तेलंगणातील चिलकुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनी या घटनेला निंदनीय असं म्हटलंय. “हे निंदनीय कृत्य आहे. पती-पत्नीसुद्धा तिथे (मंदिरात) एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेलच्या रुममध्ये जाऊन ते करू शकता. तुमचं वर्तन हे रामायण आणि देवी सीता यांचा अपमान करण्यासारखं आहे”, असं ते म्हणाले.
बुधवारी सकाळी क्रिती सनॉन आणि ओम राऊत यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन श्री व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथून निघताना ओम राऊत यांनी क्रितीच्या गालावर हलका ‘किस’ केला. याच गुडबाय किसवरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. ओम राऊत आणि क्रितीच्या या व्हिडीओवर भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू नागोथू यांनी टिप्पणी केली.
सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून मंदिराजवळ अशा पद्धतीने जाहीर वागणुकीची गरज होती का, असा सवाल त्यांनी केला. ‘तिरुमलामधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा पद्धतीने किस करणे, मिठी मारणे हे अत्यंत अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं. तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या वादादरम्यान क्रितीने गुरुवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. क्रितीने आदिपुरुषच्या तिरुपती इथल्या कार्यक्रमातील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘माझं हृदय सकारात्मकता, तिरुपतीची पवित्र आणि शक्तीशाली ऊर्जा आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने भरलंय. माझ्या चेहऱ्यावर अजूनही हास्य तसंच आहे’, असं तिने लिहिलं आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर अद्याप क्रिती किंवा ओम राऊत यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.