संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही वेब सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. या सीरिजला प्रेक्षक-समिक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोइराला, रिचा चड्ढा, अदिती राव हैदरी, संजिदा शेख, शर्मिन सेहगल, अध्ययन सुमन, शेखर सुमन यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘हिरामंडी’मधील काही इंटिमेट सीन्स सध्या चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता इंद्रेश मलिक सहकलाकार जेसन शाहसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल व्यक्त झाला.
“तो सीन शूट करताना आम्हाला फार रिटेक्स घ्यावे लागले नव्हते. ही गोष्ट फार समाधानकारक होती कारण जोपर्यंत संजय सरांच्या मनानुसार सीन शूट होत नाही, तोपर्यंत ते शांत बसत नाहीत. ते परफेक्शनिस्ट आहेत. तो सीन शूट करण्याआधी मी थोडा चिंतेत होतो. कारण दुसऱ्या पुरुषासोबतचा तो इंटिमेट सीन होता. तो शूट करण्याच्या आधी मी आणि जेसन त्यावर जवळपास एक तास चर्चा केली होती. त्यानंतर कॅमेरासमोर शूट करण्यात मदत झाली”, असं इंद्रेशने सांगितलं.
या वेब सीरिजमध्ये इंद्रेशने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत बरेच सीन्स शूट केले होते. “एका सीनदरम्यान सोनाक्षीला तिच्या पायांनी माझं डोकं धरायचं होतं. त्या सीनच्या शूटिंगदरम्यान सोनाक्षीची आईसुद्धा सेटवर उपस्थित होती. त्यामुळे मला सीन सूट करताना थोडा दबाव आल्यासारखं वाटलं होतं. मात्र सोनाक्षीने मला सावरून घेतलं. तू ताण घेऊ नकोस आणि निवांत होऊ अभिनय कर, असं तिने सांगितलं. त्यामुळे पुढे काम करणं अधिक सोपं झालं”, असं तो पुढे म्हणाला.
संजय लीला भन्साळी हे ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटात जी भव्यता, जी श्रीमंती दिसते, ती दुसऱ्या कोणत्याच भारतीय दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये सहसा पहायला मिळत नाही. याच भव्यदिव्यतेनं ‘हिरामंडी’ची प्रत्येक फ्रेम सजली आहे. भव्य सेट उभारण्यामागे जी मेहनत घेतली गेली, त्याचे बारकावे या सीरिजमध्ये पहायला मिळतात. ‘हिरामंडी’ची कथा अत्यंत रंजक आहे. हिरामंडी हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा. देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी त्याकाळी कोठ्यावर पहायला मिळायच्या.