Hema Malini | “त्यांनी मला साडीचा पिन काढायला सांगितलं अन्..”; हेमा मालिनी यांनी केली निर्मात्याची पोलखोल
काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींची माफी मागितली होती. वय आणि आजारपणाचं कारण देत त्यांनी पश्चात्तापसुद्धा जाहीर केला होता.
मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट केले. अभिनयापासून ते राजकारणापर्यंत त्यांनी यशस्वी प्रवास केला. वेळोवेळी त्या त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोकळेपणे भाष्य करताना दिसल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. त्याचप्रमाणे या मुलाखतीत त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाचा किस्सादेखील सांगितला. हेमा असा चित्रपट करणार नाहीत हे माहीत असतानाही राज कपूर यांनी त्यांच्याशी कशा पद्धतीने संपर्क साधला, याविषयी त्यांनी सांगितलं.
कास्टिंग काऊचचा धक्कादायक प्रसंग
या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी संबंधित निर्मात्याचं नाव न घेता त्यांच्यावर कास्टिंग काऊचचा आरोप केला. “त्यांना एक सीन शूट करायचा होता. मी नेहमी माझ्या साडीला पिन लावायचे. सीन शूट करताना मी त्यांना म्हणाले की साडी सुटून जाईल. त्यावर ते म्हणाले, आम्हाला तेच हवंय”, असं त्यांनी सांगितलं. आजकालचे चित्रपट निर्माते आपल्या कलाकारांना चांगलं दिसण्यासाठी कष्ट घेत नाही, असंही त्या म्हणाल्या. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, “आजकाल शूटिंग करणं खूप आव्हानात्मक झालं आहे. मला वाटत नाही की मी पुन्हा चित्रपटात काम करू शकेन.”
View this post on Instagram
या मुलाखतीत त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटाचा किस्सा सांगितला. “राज कपूर मला म्हणाले की हा असा चित्रपट आहे, जो तू करणार नाहीस हे मला माहीत. पण तरी माझी इच्छा आहे की तू यात काम करावंस”, असं त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर त्यावेळी हेमा यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या आईंनेही नकारार्थी मान हलवली होती.
काही दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींची माफी मागितली होती. वय आणि आजारपणाचं कारण देत त्यांनी पश्चात्तापसुद्धा जाहीर केला होता. करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.