विरोधी पक्षाच्या 141 खासदारांचं निलंबन का? हेमा मालिनी यांचं उत्तर ऐकून भडकले नेटकरी
सोमवारी लोकसभेतील 36 तर राज्यसभेतील 45 अशा एकूण 78 खासदारांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारीही गदारोळ चालू राहिल्याने लोकसभेतील 47 खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे संसदेतील एकूण निलंबित खासदारांची संख्या 141 झाली.
नवी दिल्ली : 21 डिसेंबर 2023 | राज्यसभा आणि लोकसभेतून 141 खासदारांच्या निलंबनावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. विरोधाक आक्रमक झाले आहेत. तर आता भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीसुद्धा त्यावर आपलं मत मांडलं आहे. विरोधी पक्षाचे खासदार हे खूप प्रश्न विचारतात आणि विचित्र वागतात. म्हणूनच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली. त्यावर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. हेमा मालिनी यांच्या या वक्तव्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
“त्यांनी काहीतरी चूक केली आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येकाने संसदेच्या नियमांनुसार वागणं गरजेचं आहे. त्यांनी नियमांचं पालन केलं नाही. म्हणूनच खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यात काहीच चुकीचं नाही. हे योग्यच आहे”, असं हेमा मालिनी म्हणाल्या. या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेत्यांनी हेमा मालिनी यांची खिल्ली उडवली आणि म्हणाले की भाजपाच्या खासदाराने अखेर निलंबनामागील खरं कारण उघड केलं. तेलंगणा काँग्रेसचे नेते समा राम मोहन रेड्डी यांनी हेमा मालिनी यांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओवर ट्विटरवर शेअर केला. ‘ते खूप प्रश्न विचारतात, म्हणूनच त्यांना निलंबित केलं गेलं’, असं वक्तव्य हेमा मालिनी यांनी केल्याचं त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
“हे पहा, ते इतके प्रश्न विचारतात आणि विचित्र वागतात. म्हणूनच त्यांना निलंबित केलं गेलंय. निलंबनाची कारवाई केली म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी चुकीचं केलं असेल”, असं हेमा मालिनी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘जर विद्यार्थ्यांनी सारखे प्रश्न विचारले तर शिक्षक त्यांना वर्गाबाहेर काढतील का’, असा प्रतिप्रश्न एका नेटकऱ्याने केला. तर ‘लोकशाहीचा अर्थ काय असतो मॅडम?’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.
पहा व्हिडीओ
Finally, a BJP MP has revealed the reason for the suspension of Congress and opposition MPs.
BJP MP Hema Malini:— They ask too many questions that’s why they are suspended. pic.twitter.com/KYOH7vZPF0
— Sama Ram Mohan Reddy (@RamMohanINC) December 19, 2023
संसदभवनाच्या मुख्यद्वाराच्या पायऱ्यांवर बसून केंद्र सरकारचा निषेध करत असताना तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांची नक्कल केली होती. त्याचा व्हिडीओ राहुल गांधींनी शूट केला होता. त्यामुळे बॅनर्जींची नक्कल संसदेच्या आवारात चर्चेचा विषय ठरला होता. याची राज्यसभेमध्ये धनखड यांनी गंभीर दखल घेतली. बॅनर्जी यांचं नाव न घेता, हे कृत्य अत्यंत लाजिरवाणं, लज्जास्पद, आक्षेपार्ह असल्याची संतप्त प्रतिक्रिया धनखड यांनी सभागृहामध्ये व्यक्त केली.