Hemangi Kavi | ‘मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं..’; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत
या पोस्टवर हेमांगीने लिहिलं, 'खूप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका.' हेमांगीच्या या कमेंटनंतर नेटकऱ्यांनीही विविध मतं मांडली आहेत.
मुंबई | 8 ऑगस्ट 2023: अभिनेत्री हेमांगी कवी अनेकदा बोल्ड मानल्या जाणाऱ्या, सहसा मोकळेपणे व्यक्त न होणाऱ्या विषयांवर सोशल मीडियावर दिलखुलास मतं व्यक्त करताना दिसते. तिची ‘बाई.. ब्रा आणि बुब्स’ ही पोस्ट तुफान गाजली होती. त्यावर नेटकऱ्यांनी विविध मतमतांतरे मांडली होती. आपल्या या पोस्टमधून तिने एकंदरीत स्त्री आरोग्य, ब्रा आणि पुरुषी मानसिकतेचा चांगलाच समाचार घेतला होता. आता हेमांगीची नवीन फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने मासिक पाळीबद्दल लिहिलं आहे. एका युजरने मासिक पाळी असताना देवळात का जाऊ नये, याचं वैज्ञानिक कारण आणि त्या कारणावर टीका करणारी पोस्ट लिहिली आहे. त्याच पोस्टवर हेमांगीने कमेंट केली आहे.
स्त्रियांनी मासिक पाळीच्या वेळी देवळात का जाऊ नये, याची वैज्ञानिक कारणं सांगणारा एक व्हिडीओ संबंधित युजरने सोशल मीडियावर पाहिला होता. त्यावरूनच तिने पोस्ट लिहिली. ‘आपल्या शरीरात सात का नऊ वायू असतात, त्यापैकी मासिक पाळीवेळी अशुद्ध रक्त खाली ढकलणारा प्रसूती वायू कार्यरत असतो. देवळात वरच्या दिशेने जाणारे वायू असतात आणि ते एकमेकांना अडथळा करतात. यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो’, अशा आशयाचा हा व्हिडीओ होता. या कारणांना वैज्ञानिक तरी म्हणू नका, असं संबंधित युजरने म्हणत फटकारलं.
या पोस्टवर हेमांगीने लिहिलं, ‘खूप महत्त्वाचं! मासिक पाळी असताना देवळात जावंसं वाटतं जा! नाही वाटत? नका जाऊ! पण मग या सगळ्यात विज्ञानाची माती करू नका.’ हेमांगीच्या या कमेंटनंतर नेटकऱ्यांनीही विविध मतं मांडली आहेत. कमेंट्समध्ये ट्रोल करणाऱ्यांनाही हेमांगीने सडेतोड उत्तरं दिली आहेत.
‘मला हे माझ्या बायकोलासुद्धा समजावता आलेलं नाही अजून. ती कॉलेजमध्ये लाइफ सायन्सची प्राध्यापिका आहे’, असं एकाने लिहिलं. त्यावर हेमांगी म्हणाली, ‘म्हणजे हे किती खोलवर रुजलंय.’ ‘हे सगळं ज्ञान बाकी धर्माच्या बाबतीत कुठे जात हो?’, असा सवाल करणाऱ्याला हेमांगीने उत्तर देत लिहिलं, ‘आपल्या घरात काय चाललंय ते आधी पहावं, दुरुस्त करावं. मग दुसऱ्याच्या घरात पहावं. आपलं सोडून दुसऱ्याचं घर दुरुस्त करण्याच्या नादात पडू नये. माझा आपला सरळ साधा हिशोब आहे.’