साडी नेसण्याची ही कोणती पद्धत? अजब फॅशनमुळे हेमांगी कवी ट्रोल
अभिनेत्री हेमांगी कवीने 'झी रिश्ते अवॉर्ड्स'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्या रेड कार्पेट लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. हेमांगीने अनोख्या पद्धतीने साडी नेसली होती. मात्र तिच्या या लूकमुळे अनेकांनी ट्रोलसुद्धा केलंय. साडी नेसण्याची ही कोणती पद्धत, असा सवाल काहींनी केला आहे.
मुंबई : 22 फेब्रुवारी 2024 | पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रत्येक कलाकाराचं अनोखं फॅशन पहायला मिळतं. खास या रेड कार्पेट लूकसाठी अभिनेत्री लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र अनेकदा अजब फॅशनमुळे त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येतात. रेड कार्पेटवर अनेकदा आपण बॉलिवूड अभिनेत्रींना बोल्ड अंदाजात पाहिलंय. मात्र आता मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. झी रिश्ते अवॉर्ड्सला तिने हजेरी लावली होती. यावेळी रेड कार्पेटवर तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. तिचा हा व्हिडीओ एका पापाराझी अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र यावेळी हेमांगी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होताना दिसतेय.
‘झी रिश्ते अवॉर्ड्स’साठी हेमांगीने काळ्या रंगाचा अनोखा आऊटफिट परिधान केला आहे. विशेष म्हणजे ही वेगळ्या पद्धतीची साडीच आहे. चंदेरी काठ असलेली काळ्या रंगाची साडी तिने नेसली असून वर काळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. डीप नेक कोटवर तिने ऑक्सडाइज्ड दागिने घातले आहेत. काठपदराच्या साडीचा असा अनोखा लूक पाहून नेटकऱ्यांनी व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना हेमांगीचा हा अंदाज पसंत पडला तर काहींनी त्यावरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
‘ही कोणती साडी नेसण्याची पद्धत’, असा सवाल एकाने केला. तर ‘साडीची ऐशी तैशी केली’, अशा शब्दांत दुसऱ्या युजरने नाराजी व्यक्त केली. ‘साडी हा आपला पवित्र पोशाख आहे, तिला तुम्ही अशाप्रकारे नेसून तिचा अपमान करत आहात’, असंही एकाने म्हटलंय. ‘गरज नसतानाही तिने सुंदर लूक खराब केला आहे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी हेमांगीला ट्रोल केलंय.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
हेमांगी अनेकदा बोल्ड मानल्या जाणाऱ्या, सहसा मोकळेपणे व्यक्त न होणाऱ्या विषयांवर सोशल मीडियावर दिलखुलास मतं व्यक्त करताना दिसते. तिची ‘बाई.. ब्रा आणि बुब्स’ ही पोस्ट तुफान गाजली होती. त्यावर नेटकऱ्यांनी विविध मतमतांतरे मांडली होती. आपल्या या पोस्टमधून तिने एकंदरीत स्त्री आरोग्य, ब्रा आणि पुरुषी मानसिकतेचा चांगलाच समाचार घेतला होता. मासिक पाळीबाबतही तिने एक पोस्ट लिहिली होती, ज्याची सोशल मीडियावर चर्चा झाली होती.