‘यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा..’; ‘झिम्मा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
'झिम्मा' या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे विविध मुद्द्यांवर आपली मतं मोकळेपणे मांडताना दिसतो. मंगळवारी विरारमधील विवांता हॉटेलमध्ये घडलेल्या घडामोडींनंतर त्याने एक्स अकाऊंटवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
गेले महिनाभर प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचं मतदान आज होतंय. त्यापूर्वी मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करून बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपची कोंडी केली. आमदार हितेंद्र ठाकूर आणि बविआच्या कार्यकर्त्यांनी साडेचार तास आक्रमक पवित्रा घेत हॉटेलमध्ये तावडे यांना रोखून धरलं होतं. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत एका खोलीतून 9 लाखांची रोकड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जप्त केली. या सर्व नाट्यमयी घडामोडींवर सोशल मीडियाद्वारे विविध प्रतिक्रिया समोर आल्या. आपली मतं बिनधास्तपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक हेमंत ढोमे याने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिलेलीच पोस्टसुद्धा चर्चेत आली आहे. ‘यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय.
हेमंतची पोस्ट-
‘निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे ‘विनोद’ नाही गड्या. मंडळी उद्या विचार करून मतदान करा. यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा,’ अशी उपरोधिक पोस्ट त्याने लिहिली आहे. यासोबतच #कोणाचा_गेम_कोणाला_फेम असा हॅशटॅग त्याने दिला आहे. यासोबतच हेमंतने नाशिकमधल्या एका हॉटेलमधून दोन कोटी रुपये जप्त झाल्याच्या बातमीचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं, ‘वाटेंगे तो जितेंगे’.
निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे…
‘विनोद’ नाही गड्या!
मंडळी उद्या विचार करून मतदान करा!
यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! #कोणाचा_गेम_कोणाला_फेम #वसईविरार #vasaivirar #MaharahstraElection2024
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 19, 2024
मंगळवारी सकाळी तावडे विरारमधील विवांता हॉटेलमध्ये काही नागरिकांना भेटण्यासाठी आले होते. याठिकाणी पैसेवाटप होत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले. पैसे दिल्याचा उल्लेख असलेल्या डायऱ्या तसंच पैशांची पाकिटं सापडल्याचा आरोप बविआने केला. घटनेचं गांभीर्य पाहून आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना जाब विचारला. हा गोंधळ सुमारे साडेचार तास सुरू होता. याप्रकरणी विनोद तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांवर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तावडे यांनी सर्व आरोप फेटाळले असून निवडणूक आयोगाने हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.