Uddhav Thackeray: ‘तुम्ही कायम लक्षात राहणार’, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत
"माझी एकही माणूस माझ्याविरोधात उभा राहिला तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं ठरेल. मला तो खेळच खेळायचा नाही. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत कधीही नव्हती", असं उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शक्तिपरीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे. “माझी एकही माणूस माझ्याविरोधात उभा राहिला तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं ठरेल. मला तो खेळच खेळायचा नाही. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत कधीही नव्हती”, असं उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर केलं. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अभिनेता हेमंत ढोमेनंही (Hemant Dhome) ट्विट करत त्यांचे आभार मानले.
‘धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब, तुमचा संपूर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार,’ अशी पोस्ट हेमंतने लिहिली आहे.
हेमंत ढोमेची पोस्ट-
Thank you @OfficeofUT !!! तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता… कोरोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणुन आमची काळजी घेतली… आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणुन अलविदा म्हणताना खरच वाईट वाटतंय… धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार! #thankyou #UddhavThackarey #CM
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) June 29, 2022
एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतरही हेमंतने ट्विटरच्या माध्यमातून उपरोधिक मत व्यक्त केलं होतं. ‘आम्ही बंड केलं की आई कालथ्याने चटका द्यायची. पण ती तेव्हा प्रायवेट विमानाने डायरेक्ट गुवाहाटीला घेऊन गेली असती तर आज आमची आयुष्यं वेगळी असती. काय म्हणता?,’ असं ट्विट त्याने केलं होतं.
शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोड्याच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली.