लाहोर : काही महिन्यांपूर्वी एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आयेशा मानो नावाच्या या तरुणीने तिच्या स्वत:च्या मेहंदी कार्यक्रमात ‘मेरा दिल ये पुकारे आजा..’ या गाण्यावर डान्स केला होता. तिचा हा व्हिडीओ केवळ पाकिस्तानच नाही तर भारत आणि इतर देशांमध्येही गाजला होता. या व्हिडीओमुळे आयेशा प्रकाशझोतात आली होती. नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये तिला बोलावण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे माध्यमांमध्येही तिने मुलाखती दिल्या होत्या. आता त्याच तरुणीबद्दल धक्कादायक माहिती सोशल मीडियावर पसरत आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे आयेशाचा मृत्यू झाल्याची माहिती व्हायरल होत आहे.
आयेशाच्या मृत्यूच्या पोस्टने नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे, तर काहींनी त्या वृत्तामागचं सत्य जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र या बातमीच फक्त इतकंच सत्य आहे की आयेशाचं निधन झालं आहे. मात्र ती आयेशा ही पाकिस्तानी तरुणी आयेशा मानो नाही, तर आयेशा हनीफ आहे. या दोघांमधील साम्य म्हणजे दोघीसुद्धा टिकटॉकर आहेत. नावातही साम्य आढळल्याने सोशल मीडियावर हा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेकजण आयेशा मानोचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली वाहत आहेत.
पाकिस्तानी न्यूज वेबसाइट एक्स्प्रेस ट्रिब्युनने दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी सकाळी जिन्ना मेडिकल सेंटरमधअये एक महिला टिकटॉकरचा मृतदेह आढळला. याप्रकरणी आयेशा हनीफचा पती मोहम्मद आदिल आणि सासू नुसरत सोबिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा हनीफ ही डीएचफ फेज 1 मध्ये एका घरातील प्रायव्हेट पार्टीमध्ये सहभागी झाली होती. त्या घराचा मालक अद्याप समोर आला नाही.
आयेशा हनीफ आणि आदिल यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. आयेशाने स्वत:च्या मर्जीने ड्रग्जचा ओव्हरडोस घेतला किंवा तिला बळजबरीने देण्यात आला, अशी चर्चा सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
आयेशाचा लग्नातील डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नागिन’ या चित्रपटातील गाण्यावर तिने ठेका धरला होता. या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनवरील तिच्या डान्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर अनेकांनी तिच्याप्रमाणे डान्स करत सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केले होते. यात सेलिब्रिटींचाही समावेश होता.