विकी कौशलच्या चित्रपटातून साराची एग्झिट; ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री घेणार तिची जागा
विकीच्या चित्रपटातून सारा अली खानला का काढलं? समोर आलं कारण
मुंबई- अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) आगामी ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. मात्र काही कारणास्तव शूटिंग रखडलं गेलं. यामध्ये विकीसोबत अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिका साकारणार होती. मात्र साराची जागा आता या चित्रपटात एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने घेतल्याचं कळतंय. ही दाक्षिणात्य अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून समंथा रुथ प्रभू आहे. पहिल्यांदाच विकी आणि समंथाची जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
चित्रपटाच्या कथेत नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. या बदलानंतर सारा त्या भूमिकेसाठी योग्य वाटणार नाही, असं निर्मात्यांना वाटू लागलं. सुरुवातीला त्यांना कमी वयाची अभिनेत्री हवी होती. म्हणूनच त्यांनी साराची निवड केली होती. मात्र बदलांनंतर आणि तारखा जुळू न लागल्याने, साराची जागा समंथाने घेतली.
बदललेल्या स्क्रीप्टनुसार आता या चित्रपटात वयाने थोडी मोठी दिसणाऱ्या अभिनेत्रीची गरज आहे. त्यामुळे समंथाला ही ऑफर दिल्याचं कळतंय. समंथाने चित्रपटाची ऑफर अद्याप स्वीकारली की नाही हे मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही.
या चित्रपटाची कथा महाभारतातील अश्वत्थामा या पात्राशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. हा संपूर्ण चित्रपट तयार होईपर्यंत जवळपास आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
चित्रपटातील अभिनेत्रीची भूमिका बदलली असली तरी विकीच्या भूमिकेत कोणताच बदल झाला नसल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ फेम आदित्य धर करणार आहे.