रॅम्प वॉकदरम्यान दोनदा हिनासोबत घडली ही गोष्ट; चाहत्यांकडून काळजी व्यक्त, व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री हिना खानच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅशन डिझायनर कियायोसाठी तिने रॅम्प वॉक केला होता. अत्यंत आत्मविश्वासाने हिनाने या वॉकची सुरुवात केली होती, परंतु दोन पावलं चालल्यानंतर...

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान तिच्या धाडसामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेकांसाठी प्रेरणा ठरतेय. ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिनाने कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही. कॅन्सरवरील उपचार सुरू असतानाही तिने तिचं काम सुरू ठेवलंय. नुकतंच तिने फॅशन डिझायनर कियायोसाठी रॅम्प वॉक केला होता. शो स्टॉपर बनलेल्या हिनाने अत्यंत आत्मविश्वासाने रॅम्प वॉकला सुरुवात केली होती. परंतु दोन पावलं पुढे जाताच तिच्या पायाखाली ड्रेस आला आणि ती अडखळली. त्यातून सावरत हिना थोडी पुढे आली, मात्र पुन्हा एकदा तिचा ड्रेस पायाखाली आल्याने ती अडखळली. असंख्य प्रेक्षक, डिझायनर्स, फोटोग्राफर्स आणि माध्यमांसमोर असं होऊनही हिनाच्या चेहऱ्यावर जराही आत्मविश्वास गमावल्याची किंवा कसलीही भीती दिसली नाही. ज्या कॉन्फिडन्सने तिने रॅम्प वॉकची सुरुवात केली, त्याच उत्साहाने तिने हा वॉक पूर्ण केला. हिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
कियायोने हिनासाठी अत्यंत सुंदर ड्रेस डिझाइन केला होता. काळ्या रंगाचा फुल स्कर्ट आणि त्यावर भरजरी टॉप असा हा ड्रेस होता. त्यावर हिनाने ऑक्सडाइज्ड दागिने परिधान केले होते. या संपूर्ण लूकला साजेसं असं मेकअपदेखील तिने केलं होतं. रॅम्प वॉक करताना अडखळल्याचा तिचा व्हिडीओ पाहून एकाने लिहिलं, ‘हिनाने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने परिस्थिती हाताळली.’ तर ‘म्हणूनच तिला शेरनी असं म्हणतात’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी हिनाच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली.




View this post on Instagram
जून 2024 मध्ये हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. आधी सर्जरी आणि त्यानंतर किमोथेरपी घेत हिनाने उपचार सुरू ठेवले आहेत. सोशल मीडियाद्वारे ती कॅन्सरविषयी जागरुकता निर्माण करण्याचा आणि पीडितांमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करते. पहिल्या किमोनंतर हिनाच्या शरीरावर काही डागसुद्धा दिसून आले. याविषयी नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त केली. मात्र सकारात्मक विचार डोक्यात ठेवून या सर्व गोष्टींना सामोरं जात असल्याचं हिनाने चाहत्यांना सांगितलं आहे. किमोथेरेपी सुरू करण्यापूर्वी हिनाने तिचे केससुद्धा कापले. किमोथेरेपीमुळे केस गळतात. त्यामुळे आधीच हिंमत दाखवत हिनाने तिचे केस छोटे केले. त्याचा व्हिडीओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.