‘व्हिला व्हिएना’ ते ‘मन्नत’.. शाहरुख खानच्या बंगल्याचा इतिहास जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला हा असंख्य चाहत्यांसाठी जणू सेल्फी पॉईंटचं ठिकाण बनलं आहे. या बंगल्याचं जुनं नाव, तो शाहरुखने कसा विकत घेतला, त्याआधी तो कोणाच्या मालकीचा होता.. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांची आलिशान घरं.. हा चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. मुंबईत अनेक सेलिब्रिटींची घरं, बंगले आहेत, जी चाहत्यांसाठी पर्यटन स्थळापेक्षा किंवा सेल्फी पॉईंटपेक्षा कमी नाहीत. असाच एक बंगला म्हणजे ‘मन्नत’. बॉलिवूडच्या ‘किंग’ला शोभावं असं हे आलिशान, सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण घर. अभिनेता शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला सध्या चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तो आणि त्याचं कुटुंब वांद्रेच्या पाली हिल इथल्या तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतरित होत आहे. त्याचं घर आणि ग्रेड 2-बी स्ट्रक्चरमधील हेरिटेज इमारत ‘मन्नत’च्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. शाहरुख आणि त्याची इंटेरिअर डिझायनर पत्नी गौरी खान यांनी ‘मन्नत’चे दोन मजले वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या इमारतीचा बिल्ट अप एरिया आता 616.02 चौरस मीटरने वाढला आहे. नूतनीकरणानंतर ‘मन्नत’ कसा दिसेल, हे पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर ‘मन्नत’च्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात..
व्हिला व्हिएना
इंटरनेटवर ‘मन्नत’बद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. वांद्रे आणि सांताक्रूझचा इतिहास लिहिणारे मुंबईतील इतिहासप्रेमी देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यावर सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये ‘वांद्रे टाइम्स’ या सामुदायिक वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या ‘मॅन्शन बाय द सी: द हिस्ट्री ऑफ व्हिला व्हिएना’ या लेखात त्यांनी ‘मन्नत’विषयीची सविस्तर माहिती लिहिली आहे. ‘मन्नत’बद्दल त्यांना जे काही माहीत आहे, ते कालांतराने आलेल्या मौखिक कथांवरूनच माहीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. चक्रवर्ती यांनी सांगितलं की ही हवेली 1800 च्या उत्तरार्धात मंडीचे (सध्याच्या हिमाचल प्रदेशातील पूर्व संस्थान) राजा बिजई सेन यांनी त्यांच्या एका राणीसाठी बांधली होती.
“डिसेंबर 1902 मध्ये राजा बिजाई सेन यांच्या मृत्यूनंतर 1915 मध्ये संस्थानाने गिरगावच्या पेरिन मानेकजी बाटलीवाला यांना ही हवेली विकली होती. पेरिन मानेकजी बाटलीवाला यांना व्हिएनीज संगीताची खूप आवड होती. त्यावरूनच त्यांनी विकत घेतलेल्या या हवेलीला ‘व्हिला व्हिएना’ असं नाव दिलं”, असं चक्रवर्ती यांनी सांगितलं. काही जुनी लोकं अजूनही या इमारतीला व्हिला व्हिएना असंच म्हणतात.

व्हिला व्हिएना आणि त्याच्या डाव्या बाजूला केकी मंझील बंगला (छायाचित्र सौजन्य: (Debasish Chakraverty’s Archives))
वांद्रे इथल्या मानववंशशास्त्रज्ञ आणि इतिहासकार अक्षय चव्हाण यांनीसुद्धा ही हवेली राजा बिजाई सेन यांनी बांधली असावी असं म्हटलंय. “मंडीचे राजा बिजाई सेन यांचा वांद्रे इथं एक बंगला होता अशी नोंद आहे”, असं चव्हाण म्हणाले. राजाचं निधन 1902 मध्ये झाल्याचं लक्षात घेता ही हवेली 1880-90 च्या दशकात बांधली गेली असावी. “पटियाला, कॅम्बे, मंडी, कच्छ आणि ग्वाल्हेर यांसारख्या अनेक संस्थानांचे वांद्रे, जुहू आणि वर्सोवा इथं बंगले होते. कारण ही ठिकाणी समुद्राच्या जवळची आहेत. एकदा का ही जागा नवीन मालकांनी विकत घेतली, त्यानंतर त्या जुन्या बंगल्यांचं नुतनीकरण करणं सर्वसामान्य गोष्ट आहे”, असं ते पुढे म्हणाले.
चक्रवर्ती यांनी त्यांच्या लेखासाठी वांद्रे परिसरात बऱ्याच वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांशी चर्चा केली. त्यांच्या गप्पांमधून आणि ‘बँड्रा: इट्स रिलिजियस अँड सेक्युलर हिस्ट्री’ या पुस्तकातून त्यांनी माहिती घेतली आहे. “हे पुस्तक 1927 मध्ये प्रकाशित झालं होतं आणि प्रसिद्ध इतिहासकार ब्राझ अँथनी फर्नांडिस यांनी लिहिलेलं वांद्रेच्या इतिहासातील सर्वांत श्रीमंत दस्तऐवज आहे”, असं ते सांगतात.
बाटलीवाला यांनी ते घर त्यांची बहीण खुर्शेदबाई संजना आणि त्यांच्या पतीला विकलं. हे दोघं त्यांच्या व्यवसायात भागीदार होते. खुर्शेदबाईंना स्वत:चं मूल नसल्याने त्यांनी ही मालमत्ता त्यांची बहीण गुलबानूला मृत्यूपत्रात उल्लेख करून दिली. नंतर गुलबानू यांच्याकडून ते त्यांचा मुलगा नरीमन दुबाश यांच्याकडे गेलं.
“1990 च्या दशकाच्या मध्यात व्हिला व्हिएनाचे मालकी हक्क वेगाने बदलले. नरिमन दुबाश यांनी ते एका बिल्डरला विकलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून उद्योगपती आणि चित्रपट निर्माते भरत शाह यांनी ते विकत घेतलं. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात ते जीर्ण अवस्थेत होतं. तशाच अवस्थेत ते सध्याचे मालक आणि रहिवाशांनी ते विकत घेतलं”, असं चक्रवर्ती म्हणाले.
परंतु ‘मन्नत’ बंगल्याला लागून असलेल्या ‘केकी मंझिल’ या हेरिटेज इमारतीत राहणारे गांधी कुटुंबीय वेगळीच कथा सांगतात. आदिल गांधी यांच्या मते, व्हिला व्हिएना हे त्यांचे वडील केकू गांधी यांचे आजोबा मानेकजी बॉटलवाला यांनी बांधलं होतं, बाटलीवाला यांनी नाही.
“1920 च्या दशकात मानेकजी बॉटलवाला युरोपला गेले आणि व्हिएनाच्या प्रेमात पडले. 18 व्या आणि 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात न्युरोक्लासिकल आर्किटेक्चरलच्या पुनरुज्जीवनाने त्यांची कल्पनाशक्ती व्यापली होती. त्यामुळे मुंबईत परतल्यावर त्यांनी नव्याने बांधलेल्या केकी मंझिलच्या शेजारी एक जमीन खरेदी केली, जिथे त्यांची मोठी मुलगी रोशन (केकूची आई) त्यांच्या लग्नानंतर राहत होत्या. या जागेवर त्यांनी व्हिला व्हिएना नावाचा आलिशान बंगला बांधला. हा बंगला अत्यंत भव्य होता आणि त्याच्या भौमितिक रचनेत तितकाच साधेपणा होता. त्याच्या दर्शनी भागावर डोरिक स्तंभ होते”, असं गॅलरीस्ट, कलेक्टर आणि कला पारखी केकू गांधी यांचे पुत्र आदिल गांधी म्हणाले. आदिल गांधी हे भारतीय आधुनिक कलेच्या प्रचारासाठी ओळखले जातात.
1929 च्या आर्थिक मंदीचा गंभीर फटका बॉटलवाला यांना बसला. कारण त्यांच्या अनेक मालमत्ता बँकांकडे गहाण ठेवण्यात आल्या होत्या. 1930 च्या दशकापर्यंत, त्यांना व्हिला व्हिएना त्यांच्या बहिणीला एका अज्ञात रकमेला विकण्यास भाग पाडण्यात आलं होतं. बहिणीच्या निधनानंतर ते त्यांच्या पुतण्या, नानी आणि मानेक दुबाश यांना मृत्यूपत्रात देण्यात आलं.
“दोन्ही भावंडं मुंबईच्या मध्यभागी राहत असल्याने त्यांनी तो व्हिला विविध कुटुंबांना भाड्याने दिला. त्यापैकी सर्वांत उल्लेखनीय भाडेकरूंपैकी एक ‘गंगा जमुना’ फेम दिग्दर्शक नितीन बोस होते”, असं आदिल गांधी म्हणाले. बोस यांच्या मुली रिना आणि नीना यांच्यासोबत व्हिलाच्या भव्य बागेत आदिलसुद्धा खेळायला जायचे.
जेव्हा बोस कोलकात्याला परत गेले, तेव्हा ते घर मंडीच्या महाराजांनी भाड्याने घेतलं होतं. 1960 च्या मध्यात त्यांनी ते ताब्यात घेतलं होतं. याच बंगल्यात महाराजांच्या मुलीचं अत्यंत थाटामाटात लग्न पार पडलं होतं. लग्नाचा हा कार्यक्रम आठवडाभर चालला होता आणि त्या काळातील तो सर्वांत भव्य मानला जात होता.
“मंडीच्या कुटुंबाने हा बंगला सोडल्यानंतर व्हिला व्हिएना काही काळासाठी कॅथलिक अॅग्नेल आश्रमाने ताब्यात घेतला होता. तेव्हा त्यांनी बंगल्याच्या शिखरावर ख्रिश्चन क्रॉसदेखील लावला होता”, असं ते म्हणाले. दुबाश बंधूंनी बंगल्याची संपूर्ण मालकी कायम ठेवली होती. अखेर तो हिरे व्यापारी भरत शाह यांना विकण्यात आला होता. नंतर शाहरुख खानने त्यांच्याकडून ही मालमत्ता विकत घेतली.
“ही मालमत्ता खूप मोठी होती. त्यात एक टेनिस कोर्ट आणि मागच्या बाजूला गॅरेज होतं. सुरुवातीला शाहरुखने फक्त समोरचा बंगला खरेदी केला होता”, असं गांधी यांनी सांगितलं. नंतर भरत शाह यांनी बंगल्याची मागील बाजूसुद्धा शाहरुखला विकली. पुढे शाहरुखने बंगल्याचा संपूर्ण विस्तार केला. ‘मन्नत’च्या चमकदार स्तंभावरील ‘M’ (एम) म्हणजे मंडी असं वाटतं. पण मोनोग्राम ‘एम’ म्हणजे मानेकजी आहे. त्याचा मंडी किंवा मन्नतशी संबंध नाही, असं आदिल गांधी म्हणाले.
बंगल्याच्या आर्किटेक्चरबद्दल बोलायचं झाल्यास, चक्रवर्ती यांच्या मते ‘व्हिला व्हिएना’ हे व्हिला ला रोटोंडा नावाच्या निओ-क्लासिक रचनेवर आधारित होतं. जे 1950 च्या दशकात उत्तर इटलीतील विसेन्झा शहराबाहेर बांधलं गेलं होतं आणि प्रसिद्ध इटालियन वास्तुविशारद आंद्रिया पॅलाडिओ यांनी ते डिझाइन केलं होतं. व्हिला व्हिएनाचे डिझायनर, आर्किटेक्चर, बिल्डरची ओळख आणि बांधकामाचं नेमकं वर्ष शोधणं कठीण असल्याचं चक्रवर्ती म्हणाले.
गेल्या काही वर्षांत देव आनंद यांच्या ‘टॅक्सी ड्राइव्हर’ आणि शाहरुख खानच्या ‘येस बॉस’ या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये हा बंगला मोठ्या पडद्यावर झळकला आहे.

शाहरुखच्या ‘येस बॉस’ चित्रपटातील ‘बस इतना सा ख्वाब है’ गाण्यात झळकला व्हिला व्हिएना
बँड्रा बँडस्टँडचा इतिहास
‘मन्नत’ हा बंगला बँड्रा बँडस्टँड याठिकाणी आहे. जो सेंट अँड्र्यूज चर्च ते लँड्स एंडपर्यंत अरबी समुद्राला समांतर जाणारा सुमारे दोन किलोमीटरचा भाग आहे. या भागाचं अधिकृत नाव 19 व्या शतकातील सर बायरामजी जीजीभॉय यांच्या नावावरून बायरामची जीजीभॉय रोड असं देण्यात आलं.
“तेव्हा जीजीभॉय यांनी स्वखर्चाने हा भाग बांधला होता, ज्याला आज आपण वांद्रे बँडस्टँड म्हणतो”, असं मुंबई विद्यापीठातील माजी इतिहास प्राध्यापक अरविंद गणाचार्य यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं.
“एकेकाळी या भागात बहुतेक युरोपियन आणि काही पारशी लोकांचे बंगले होते. युरोपियन लोकांना बँड संस्कृतीत रस होता आणि म्हणूनच संध्याकाळी युरोपियन सैन्यातील सदस्य आणि वांद्रे गावांमध्ये राहणारे गोवेकर या भागात संगीत वाजवत असत. अशाप्रकारे या रस्त्याला लोकप्रिय बँडस्टँड असं नाव मिळालं”, असं त्यांनी सांगितलं.

एचके भाभा रोडवरील रॉकडेल नावाचा खाजगी बंगला (छायाचित्र सौजन्य: Debasish Chakraverty’s Archives)
वांद्रे बँडस्टँड इथल्या हेरिटेज इमारती
वांद्रे बँडस्टँड आणि त्याच्या शेजारच्या एचके भाभा रोडच्या परिसरात केवळ शाहरुख खानचा ‘मन्नत’च नाही तर इतरही अनेक हेरिटेज इमारती आहेत. “70 दशकाच्या उत्तरार्धात आणि 80 दशकाच्या सुरुवातीपर्यंत, या भागात अनेक मॅन्शन होते. जे कालांतराने नष्ट झाले. त्यावेळी लोक त्यांना बंगले नव्हे तर मॅन्शन म्हणून संबोधत असत. त्या भव्य वाड्यांपैकी एक म्हणजे बाई शिरीनबाई कामा कॉन्व्हॅलेसेंट होम. ही 120 वर्षांहून अधिक जुनी रचना होती. परंतु एप्रिल 2022 मध्ये लॉकडाऊननंतर ती लगेचच पाडण्यात आली”, असं चक्रवर्ती यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं.
माऊंट मेरी रोडवर गोडीवाला बंगला होता, ज्याची जागा आता रहेजा बे नावाच्या इमारतीने घेतली आहे. “बीजे रोडवरील मरीन मॅन्शनची जागा त्याच नावाच्या इमारतीने घेतली आहे. एचके भाभा रोडवर रॉकडेल नावाचा एक खाजगी बंगला होता. अनिल कपूरच्या मेहुणीच्या पतीच्या मालकीचा हा बंगला होता. आता त्याठिकाणी त्याच नावाची इमारत आहे. एचके भाभा रोडवरील ‘वुडले’ या ठिकाणी सध्या सी किस्ट आणि सी ग्लिम्प्स इमारती आहेत. एचके भाभा रोडवरच मेरी लॉज ही एक सुंदर जुनी हवेली होती. ती पाडून त्याठिकाणी ‘बसेरा’ नावाचं रो हाऊस बांधण्यात आलंय,” असं चक्रवर्ती यांनी सांगितलं.

मेरी लॉज (छायाचित्र सौजन्य: Debasish Chakraverty’s Archives)
हे हेरिटेज बंगले नष्ट का होत आहेत याबद्दल विचारलं असता चक्रवर्ती म्हणाले, “यामागे अनेक कारणं आहेत. ही सर्व घरं संयुक्त कुटुंबाच्या मालकीची होती. आता अशा घरांची देखभाल करणं अत्यंत महाग आहे. जर एखादा बिल्डर तुम्हाला 100 किंवा 200 कोटी रुपये देत असेल तर कोणीही ते विकायला तयार होईल. त्यामुळे यासाठी कोणालाच दोष देता येत नाही.”