संध्या थिएटरमधील घटनेत अल्लू अर्जुनचं नेमकं कुठे चुकलं? महिलेच्या मृत्यूला तो जबाबदार कसा?
याप्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक, अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्याची सुरक्षा टीम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. महिलेच्या मृत्यूप्रकरणी आता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे.
‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार थिएटरचे व्यवस्थापक, अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रीमिअरला अल्लू अर्जुन आणि इतर कलाकार येणार होते. दक्षिण भारतात अल्लू अर्जुनची तुफान क्रेझ आहे. ‘पुष्पा 1: द राइज’ या पहिल्या भागानंतर देशभरात त्याचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. या सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चित्रपटाचा ट्रेलर, टीझर आणि गाण्यांनी ही उत्सुकता अधिक ताणली होती. त्यामुळे प्रीमिअरला लोकांची तुफान गर्दी होणं स्वाभाविकच होतं. त्यातही मुख्य अभिनेत्याला ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. त्यामुळे आपल्याच चित्रपटाच्या प्रीमिअरला आलेला अल्लू अर्जुन एका महिलेच्या मृत्यूप्रकरणात नेमका कुठे चुकला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
महिलेचा मृत्यू कसा झाला?
4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरसाठी 35 वर्षीय एम. रेवती या त्यांचे पती एम. भास्कर, नऊ वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांच्या मुलीसोबत आल्या होत्या. रात्री 9.30 च्या सुमारास जेव्हा अल्लू अर्जुन त्याच्या सुरक्षेसह थिएटरमध्ये आला, तेव्हा त्याच्यासोबत असंख्य चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थिएटर व्यवस्थापनाकडून कोणतीच अतिरिक्त तरतूद करण्यात आली नव्हती. यावेळी अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकासह मोठ्या संख्येने लोक खालच्या बाल्कनी परिसरात घुसले. या गर्दीत रेवती आणि तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज यांचा श्वास गुदमरला. तिथे ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खालच्या बाल्कनीतून बाहेर काढलं. त्यांनी रेवती यांच्या मुलावर सीपीआर करून त्यांना तातडीने जवळच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या मुलाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
मृत महिलेच्या पतीने सांगितली संपूर्ण घटना
एम. भास्कर यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घटना सविस्तरपणे सांगितली. ते म्हणाले, “जेव्हा अल्लू अर्जुन आला, तेव्हा अचानक लोकांची गर्दी वाढली आणि माझी पत्नी, माझा मुलगा आमच्यापासून वेगळे झाले. मी माझ्या मुलीसोबत बाहेर उभा होतो. रेवती आणि मुलगा गर्दीने आत खेचले गेले. सुरुवातीला मी जेव्हा फोन केला, तेव्हा तिने सांगितलं की ते आत थिएटरमध्ये आहेत. मात्र नंतर तिचा फोन स्विच्ड ऑफ येत होता. माझी मुलगी गर्दीला घाबरून खूप रडत होती, म्हणून मी तिला जवळच्या नातेवाईकांकडे सोडून पुन्हा थिएटरजवळ पत्नी आणि मुलाला शोधायला आलो. तोपर्यंत ती लोकं तिथून गेली होती. काहींनी मला व्हिडीओ दाखवला आणि त्यात माझी पत्नीच दिसल्याचं मी सांगितलं. तेव्हा तिला दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल केल्याचं त्या लोकांनी मला सांगितलं. तिचं निधन झाल्यानंतर रात्री 2 वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह गांधी रुग्णालयात हलवल्याची माहिती मला देण्यात आली.”
अल्लू अर्जुनचं नेमक कुठे चुकलं?
देशभरात ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची किती क्रेझ आहे, याची पुरेपूर कल्पना अभिनेता अल्लू अर्जुनला होती. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान पाटणामध्ये त्याने स्वत: ही गर्दी पाहिली होती. त्यामुळे संध्या थिएटरचा परिसर, तिथली सुरक्षाव्यवस्था, थिएटरकडून केली जाणारी व्यवस्था या सर्व गोष्टींची माहिती त्याने टीमकडून आधीच घ्यायला हवी होती, असं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे थिएटर मॅनेजमेंटकडून गर्दीच्या व्यवस्थापनासाठी अतिरिक्त तरतूद करणं आवश्यक होतं. गर्दीच्या ठिकाणी जागा मोठी नसल्यास कलाकारांसाठी वेगळी एण्ट्री आणि एक्झिटची व्यवस्था केली जाते. त्याविषयी अल्लू अर्जुनच्या टीमने आधीच चौकशी करायला हवी होती. अथवा गर्दीचा आढावा घेऊन अल्लू अर्जुनने त्याठिकाणी जाणं टाळलं पाहिजे होतं. या सर्व कारणांमुळे अल्लू अर्जुन अडचणीत असल्याचं कळतंय.