बिग बॉसच्या घरातील भांडणं कशी सोडवणार? अनिल कपूर म्हणतात..
बिग बॉस ओटीटीचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेते अनिल कपूर या सिझनचं सूत्रसंचालन करत आहेत. त्यासाठी त्यांनी खास तयारी केली आहे. बिग बॉसच्या घरातील भांडणं सोडवण्यासाठी काय तयारी केली, याचं उत्तर त्यांनी दिलं आहे,
‘बिग बॉस ओटीटी 3’चं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खानऐवजी अनिल कपूर करत आहेत. अनिल कपूर हे त्यांचं व्यक्तिमत्त्व, अभिनयकौशल्य, स्टाइल आणि नवोदित कलाकारांसोबत जुळवून घेण्याची कला यात कुठेच कमी पडत नाहीत. बिग बॉसच्या सूत्रसंचालकपदी सलमानच्या जागी त्यांची निवड झाल्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं. मात्र सलमानची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असं ते ठामपणे सांगतात. बिग बॉसचं सूत्रसंचालन करण्यासाठी कोणत्या गोष्टी नव्याने शिकल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टींबद्दल जागरूक असलं पाहिजे याविषयी त्यांनी नीट अभ्यास केला.
बिग बॉसच्या घरातली भांडणं सोडवताना सूत्रसंचालकाचा कस लागतो. त्याची भूमिका त्यात महत्त्वाची असते. त्यामुळे मुळात घरात घडणारी भांडणं कशातून येतात, याचा विचार केल्याचं त्यांनी सांगितलं. “प्रत्येकात काही ना काही गुणदोष असतात. एखाद्या व्यक्तीवर जेव्हा खूप दबाव येतो, तेव्हा त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो. त्याच्या मूळ स्वभावासह काही गोष्टी उफाळून येतात. अशा वेळी तुम्हाला त्या स्पर्धकाविषयी माणूस म्हणून दयासुद्धा वाटते, पण त्याच वेळी शिस्त अबाधित राखणंही महत्त्वाचं असतं. प्रेम आणि शिस्त या दोन्ही गोष्टी हातात हात घालून असतात. मला नेहमीच योग्य आणि न्याय्य भूमिका घेतली पाहिजे आणि मी तेच करणार”, असं ते म्हणाले.
View this post on Instagram
‘बिग बॉस ओटीटी 3’चा प्रीमिअर नुकताच पार पडला आणि प्रीमिअरपासूनच अनिल कपूर यांच्या सूत्रसंचालनाविषयी विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. अनेकांना त्यांची वेगळी स्टाइल आवडत असून पुढील भागात ते काय करतील, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. यंदाच्या सिझनमध्ये दिल्लीची वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित, अभिनेता रणवीर शौरी, सोशल मीडिया स्टार शिवानी कुमार, अभिनेत्री सना मकबूल, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर विशाल पांडे, लवकेश कटारिया, पत्रकार दीपक चौरासिया, टीव्ही अभिनेता साई केतन राव, टॅरो कार्ड रिडर मुनिषा खतवानी, अभिनेत्री आणि इन्फ्लूएन्सर सना सुलतान खान, युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल मलिक, कृतिका मलिक हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.