सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी आरोपींना किती रुपये मिळाले?
रविवारी 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दोन अज्ञातांनी दुचाकीवरून अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळालं आहे. दोघांनाही गुजरातमधील भूज शहरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहपोलीस (गुन्हे) आयुक्त लखमी गौतम यांनी दिली. गोळीबारानंतर आरोपींनी मोबाईल आणि पिस्तूल फेकले असून त्यासाठी लवकरच पोलिसांचं पथक गुजरातला जाणार आहे. विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल अशी आरोपींची नावं असून त्यातील पाल याने अद्ययावत पिस्तुलाने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. त्यानंतर दोघांनी पळ काढत गुजरात गाठलं. या ठिकाणी येताच गुजरातमधील नदीत पिस्तुल फेकून दिले. गुन्हे शाखेचे पथक तिथे शोध मोहीम राबवणार आहेत.
आरोपींना किती रुपये मिळाले?
सलमानला घाबरवण्यासाठी बिष्णोईकडून आरोपींना गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी दोन्ही आरोपींना आधी एक लाख रुपये मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. काम फत्ते झाल्यानंतर आरोपींना आणखी तीन लाख रुपये मिळणार होते. त्यापैकी आधी मिळालेल्या एक लाख रुपयांत आरोपींनी जुनी बाईक विकत घेतली. यासाठी त्यांनी 24 हजार रुपये खर्च केले. तर पनवेल याठिकाणी 10 हजार रुपये डिपॉझिट म्हणून जमा करून दर महिना 3500 हजार रुपये भाडेतत्त्वावर घर घेतलं. यासाठी त्यांनी ओळखपत्र म्हणून खरे आधारकार्ड दिले होते. जवळपास 11 महिन्यांचा करार त्यांनी केला होता.
आरोपी अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात
आरोपींना पिस्तुल कोणी पुरवले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. विकी गुप्ता हा दहावी पास असून सागर पाल आठवी शिकलेला आहे. सलमानच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार केल्यानंतर ते रात्रभर वांद्रे इथल्या बँडस्टँड परिसरात फिरत होते. त्यातील एक आरोपी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या थेट संपर्कात होता. त्यामुळे याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे.