वडिलांचा किसिंग सीन पाहिल्यावर विवेक ओबेरॉयच्या मुलाची अशी होती प्रतिक्रिया; आईकडेही केली तक्रार
अभिनेता विवेक ओबेरॉयने एका मुलाखतीत त्याच्या 'प्रिन्स' या चित्रपटाबद्दल कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती, याविषयी सांगितलं होतं. यावेळी त्याने चित्रपटातील किसिंग सीनवर मुलाची काय प्रतिक्रिया होती, हेदेखील सांगितलं होतं.
अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेला ‘प्रिन्स’ हा चित्रपट 2010 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये विवेकसोबत अभिनेत्री अरुणा शिल्ड्स झळकली होती. कुटुंबीयांसोबत हा चित्रपट पाहताना मुलाने कोणती प्रतिक्रिया दिली, याविषयी विवेकने एका मुलाखतीत सांगितलं होतं. या चित्रपटातील ॲक्शन सीन्स मुलगा विवानला खूप आवडले होते. पण त्यातील किसिंग सीन पाहून मुलाने विवेकला थेट प्रश्न विचारला होता, “तू आईशिवाय दुसऱ्या कोणाला कसं काय किस करू शकतो?” तर दुसरीकडे मुलगी अमेयाला चित्रपटातील ॲक्शन सीन्स पाहून कंटाळा आला आणि ती मध्यातच उठून निघून गेली.
विवेकने सांगितलं की त्याच्या मुलाला ॲक्शन सीन्समुळे ‘प्रिन्स’ हा चित्रपट आवडला होता. पण त्यातील एका सीनवरून तो खूप नाराज झाला होता. आईची बाजू घेत त्याने विवेकला प्रश्न विचारला की, “तू दुसऱ्या मुलीला किस का केलंस?” हे ऐकून विवेकला प्रश्न पडला की आता मुलाला नेमकं उत्तर द्यायचं तरी काय? मुलाची प्रतिक्रिया आठवून विवेकला मुलाखतीत हसायला येतं. तो फक्त अभिनय होता, खऱ्या आयुष्यात असं काहीच घडलं नाही, असं विवेकने मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरीही विवानचं या उत्तराने समाधान झालं नाही. “तरीही हे चुकीचंच आहे”, यावर तो ठाम होता. इतकंच नव्हे तर तो आईकडे गेला आणि त्याने आईला विचारलं की, तिला काहीच प्रॉब्लेम नाही का? मुलाच्या या प्रतिक्रियेवरून घरात एकच हशा पिकल्याचं विवेकने सांगितलं.
View this post on Instagram
विवेकने ‘कंपनी’, ‘साथियाँ’, ‘ओमकारा’, ‘शूटआऊट ॲट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. नुकताच तो रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याही भूमिका होत्या. अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करू लागल्यानंतर विवेकच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. अखेर त्याने एकेदिवशी थेट पत्रकार परिषद घेत ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सलमान खानवर धमकी दिल्याचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेनंतर विवेकचं करिअर पूर्णपणे पालटलं होतं. त्याला काम मिळणं बंद झालं होतं.