अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. 2014 मध्ये हे दोघं अधिकृतरित्या विभक्त झाले. घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझानच्या आयुष्यात नव्याने प्रेम आलं. एकीकडे सुझान ही अर्सलान गोणीला डेट करू लागली, तर दुसरीकडे हृतिकसुद्धा अभिनेत्री सबा आझादच्या प्रेमात पडला. हृतिक आणि सुझान आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले असले तरी त्यांच्यात अजूनही मैत्रीपूर्ण नातं असल्याचं आणि दोघांनीही एकमेकांच्या आयुष्यातील तिसऱ्या व्यक्तीला खुल्या मनाने स्वीकारल्याचं अनेकदा पहायला मिळतं. मात्र हीच गोष्ट या दोघांच्या चाहत्यांना अजिबात पटत नाही. यावरून अनेकदा दोघांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
काही दिवसांपूर्वी सुझान खानने बॉयफ्रेंड अर्सलानच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. यासोबतच तिने त्यांच्या रोमँटिक क्षणांचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ‘मला माझ्या आयुष्यात फक्त तूच हवा आहेत. माझ्या जानला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू मला या ग्रहावरील सर्वांत आनंदी महिला बनवलंस. तुझ्या प्रेमात मी वेडी आहे’, अशा शब्दांत सुझान व्यक्त झाली होती. सुझानची ही पोस्ट पाहिल्यानंतर हृतिकनेही लगेच त्यावर कमेंट करत अर्सलानला शुभेच्छा दिल्या. हीच गोष्ट चाहत्यांना पटली नाही.
‘हॅपी बर्थडे माय फ्रेंड’ (वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा), अशी कमेंट हृतिकने या पोस्टवर केली. त्यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ‘तो तुझ्या पूर्व पत्नीचा बॉयफ्रेंड आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे सर्व करण्यासाठी खूप मोठं हृदय लागतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा सर्व दिखावा आहे. जर एवढा समजूतदारपणा असता तर घटस्फोट झाला नसता’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. हृतिक आणि सुझान यांनी लग्नाच्या 13 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल सुझान एका मुलाखतीत म्हणाली, “आम्ही आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर आलो होतो, जिथे एकमेकांसोबत न राहिलेलंच आमच्यासाठी योग्य होतं.”
हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलान या चौघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. बर्थडे पार्ट्यांनाही हे चौघं एकत्र येतात. किंबहुना सबा आणि सुझान यांच्यातही खूप चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतं. या चौघांच्या नात्याबद्दल सुझानच्या भावाने एका मुलाखतीत म्हटलं होतं, “आमचं कुटुंब हे प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम ‘मॉडर्न फॅमिली’सारखंच आहे. आम्ही जणू नव्या मॉडर्न फॅमिलीसारखंच आहोत. आमच्यात खूप वेडेपणा आहे. इथे प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीचा स्वीकार मनमोकळेपणाने करतो. या टप्प्यापर्यंत पोहोचायला निश्चितच आम्हाला थोडा वेळ लागला. पण आता आम्ही सर्वजण एकत्र खुश आहोत. ही खूप सुंदर भावना आहे. आम्ही सर्वजण एकत्र पार्टी करतो, मजामस्ती करतो, नाचतो.”