Hrithik Roshan | ‘रंग किंवा भांग नाही, फक्त..’; हृतिक रोशनच्या होळीच्या पोस्टवर भडकले नेटकरी
हृतिक लवकरच ‘फायटर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : मंगळवारी देशभरात धूळवड साजरी करण्यात आली. यावेळी सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीसुद्धा धूळवडच्या रंगात रंगले. बॉलिवूडमधल्या बऱ्याच जोडप्यांसाठी लग्नानंतरची ही पहिली आणि खास होळी होती. मात्र या सर्वांत अभिनेता हृतिक रोशनने हटके पोस्ट लिहिली. या पोस्टवरून त्याला जोरदार ट्रोल केलं जातंय. हृतिकने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण रंगपंचमी न खेळता वर्कआऊट करताना दिसत आहेत. ‘न रंग, न भांग, फक्त वर्कआऊट करत आहोत,’ असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
हृतिक रोशनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सर्वजण व्यायाम करताना दिसत आहेत. ‘न रंग, न भांग, होळीनिमित्त मॉर्निंग वर्कआऊट. तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. तुम्ही कशी होळी साजरी करत आहात?’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये हृतिकची दोन्ही मुलंसुद्धा वर्कआऊट करताना दिसत आहेत. याशिवाय त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान आणि तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसुद्धा दिसत आहे.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
हृतिकने वर्कआऊटचा व्हिडीओ जरी पोस्ट केला असला तरी त्याचा हा अंदाज काही नेटकऱ्यांना आवडला नाही. ‘ही तिच लोकं आहेत, जी टोमाटिना फेस्टिव्हल खेळतात.. वाह रे दुनिया’ असं एकाने लिहिलंय. तर ‘जेव्हा तुमच्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसा असतो, तेव्हा असेच कॅप्शन लिहून कूल बनण्याचा प्रयत्न केला जातो’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काही नेटकऱ्यांनी विरोध केला असला तरी काहींना हृतिकचा हा अंदाज आवडला आहे. ‘दमदार, तुम्हा लोकांना असं पाहून मी खूप खुश आहे, मी तुम्हाला मिस करतोय’, असं अभिनेता जायेद खानने लिहिलंय.
हृतिकने नुकतीच ‘फायटर’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. यामध्ये तो अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून पुढच्या वर्षी हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी हृतिकचा सैफ अली खानसोबत ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट विशेष कामगिरी करू शकला नाही.