अभिनेत्याच्या आरोपांनंतर सेन्सॉर बोर्डावर होणार कारवाई? चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक
विशालने सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचा आणि चित्रपटाला सर्टिफिकेटच्या बदल्यात लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्याच्या ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा खुलासा विशालने केला.
मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : तमिळ अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डातील सदस्यांवर लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप केल्यानंतर सरकारडून त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करण्यात येणार असल्याचं माहिती व प्रसारण मंत्रालयाने X द्वारे (ट्विटर) दिली. विशालच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नेमल्याचीही माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली. ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट देण्याच्या बदल्यात साडेसहा लाख रुपये लाच मागितल्याचा आरोप विशालने केला. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्याने हा मोठा आरोप केला. इतकंच नव्हे तर त्याने त्याचे पुरावेही दिले आहेत.
‘अभिनेता विशालने मांडलेला सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराचा मुद्दा अत्यंत दुर्दैवी आहे. भ्रष्टाचाराला सरकारकडून अजिबात थारा देण्यात येत नसून त्यात कोणी सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आजच मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे’, असं ट्विट मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलं आहे. अभिनेता विशालशिवाय इंडस्ट्रीतील इतरांनाही असा अनुभव आल्यास त्यांनी समोर येऊन तक्रार करावी, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.
The issue of corruption in CBFC brought forth by actor @VishalKOfficial is extremely unfortunate.
The Government has zero tolerance for corruption and strictest action will be taken against anyone found involved. A senior officer from the Ministry of Information & Broadcasting…
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) September 29, 2023
नेमकं काय घडलं?
“मुंबईतल्या सेन्सर बोर्डाच्या ऑफिसमध्ये जे घडलं ते पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या टीममधल्या एका व्यक्तीला मी सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाठवलं होतं. त्याच दिवशी सर्टिफिकेट हवा असेल तर लाखो रुपये मोजावे लागतील असं त्याला म्हटलं गेलं. अखेर आमच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. ‘मार्क अँटनी’ य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून साडेसहा लाख रुपये लाच मागण्यात आली. या साडेसहा लाखांपैकी तीन लाख रुपये सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी आणि उर्वरित साडेतीन लाख रुपये सर्टिफिकेटसाठी मागण्यात आले.” असं विशालने सांगितलं.
View this post on Instagram
विशालने या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांना टॅक केलं आहे. यासोबतच त्याने ज्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले त्याचीही माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे.