अखेर इमरान खानने सांगितलं घटस्फोटाचं कारण; 5 वर्षांनंतर केला खुलासा
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने या’ चित्रपटातून इमरानने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. त्यानंतरही तो काही चित्रपटांमध्ये झळकला, मात्र अपेक्षित असं यश त्याला मिळालं नाही. सध्या इमरान त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या लेखा वॉशिंग्टनला डेट करतोय. काही महिन्यांपूर्वीच इमरानने सोशल मीडियावर लेखासोबतचं नातं जाहीर केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो पत्नीसोबतच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. इमरानने गर्लफ्रेंड अवंतिका मलिकशी लग्न केलं होतं. या दोघांना एक मुलगी आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत इमरान म्हणाला, “घटस्फोटाविषयी मी फारसा खोलात जाऊन बोलणार नाही. कारण गॉसिपच्या आगीत मला आणखी तेल ओतायचं काम करायचं नाही. पण हे मान्य करेन की त्यावेळी मी माझ्या डोक्यावर प्रचंड ओझं घेऊन जगत होतो. माझाच माझ्याशी संघर्ष सुरू होता. त्यातून बाहेर पडण्यात माझं नातं, माझं लग्न काहीच मदत करत नव्हतं.”
“दोघांमध्ये आदर्श नातं तेव्हा निर्माण होतं जेव्हा तुम्ही दोघं एकमेकांना चांगल्या दिशेने घेऊन जाता, एकमेकांना आणखी सक्षम, शक्तीशाली बनवता. एकमेकांची साथ देऊन तुमच्यातील सर्वोत्कृष्ट गोष्ट इतरांसमोर आणता, तेव्हा त्या नात्याला सकारात्मकता येते. पण आमच्या नात्यात असं काहीच नव्हतं”, असं इमरानने पुढे सांगितलं. मार्च महिन्यात ‘वोग’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत इमरानने घटस्फोटानंतर लेखासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबुल केलं होतं.
View this post on Instagram
“लेखा वॉशिंग्टनला मी डेट करत असल्याची चर्चा खरी आहे. माझा घटस्फोट झाला आहे आणि फेब्रुवारी 2019 पासून मी पत्नीपासून विभक्त झालोय. लेखाने आमचं घर मोडलं अशी चर्चा होती. पण अशा चर्चा ऐकून मला खूप राग येतो. कारण हे फक्त स्त्रीविरोधीच नाही तर एक व्यक्ती म्हणून माझाही त्यात अपमान होतोय. आमच्याच लॉकडाऊनदरम्यान जवळीक वाढली. अवंतिकाला घटस्फोट दिल्याच्या दीड वर्षानंतर माझ्या आयुष्यात लेखा आली”, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
इमरान हा अभिनेता आमिर खानचा भाचा आहे. बऱ्याच काळापासून तो चित्रपटांपासून दूर आहे. मात्र इमरान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतो. गेल्या काही महिन्यांपासून इमरानच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. पत्नी अवंतिका मलिकला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्या आयुष्यात लेखा वॉशिंग्टनची एण्ट्री झाली आहे. लेखा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.