अभिजीत सावंतला विजेता ठरवण्यासाठी माझ्यासोबत फसवणूक; ‘इंडियन आयडॉल’च्या स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल’वरून बऱ्याचदा वाद निर्माण झाला आहे. टीआरपीसाठी हा शो स्क्रिप्टेड केल्याचा आणि त्यात विनाकारण ड्रामा दाखवल्याचा आरोप आजवर बऱ्याच कलाकारांनी केला आहे. आता एका माजी स्पर्धकाने शोविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत.
मुंबई : 17 नोव्हेंबर 2023 | ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या रिॲलिटी शोची चांगली लोकप्रियता आहे. या शोचा पहिला सिझन तुफान गाजला होता. प्रेक्षकांच्या वोटिंगच्या आधारावर इंडियन आयडॉलचा विजेता ठरवला गेला. पहिल्या सिझनपासून आतापर्यंत या शोमधून उत्तमोत्तम गायक समोर आले. अभिजीत सावंत हा पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. त्यावेळी अमित साना रनरअप होता. आता बऱ्याच वर्षांनंतर अमित सानाने इंडियन आयडॉल या शोवर आणि वाहिनीवर गंभीर आरोप केले आहेत.
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अमित सानाने सांगितलं की ग्रँड फिनालेच्या दोन दिवस आधीपासून त्याची वोटिंग लाइन बंद करण्यात आली होती. अभिजीत सावंतला विजेता बनवण्यासाठी वाहिनीकडून असं करण्यात आल्याचा आरोप अमितने केला आहे. अमितने सांगितलं की या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा त्याने अभिजीला विचारलं की तुझे वोटिंग लाइन्स चालू आहेत का? त्यावर अभिजीतने त्याला होकारार्थी उत्तर दिलं होतं. माझे कुटुंबीय अभिजीतला वोट करू शकत होते, पण मला नाही, असंही अमित म्हणाला.
View this post on Instagram
याविषयी अमित पुढे म्हणाला, “त्यावेळी राजकीय प्रभावसुद्धा खूप होता. मात्र ग्रँड फिनालेमध्ये मी खूप चांगला परफॉर्म केला होता. जेव्हा शिल्पा शेट्टीने अभिजीतच्या हास्याचं कौतुक केलं, तेव्हापासून त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जाऊ लागलं. याच कारणामुळे त्याला जास्त वोट्स मिळाले.” या मुलाखतीत अमितने राहुल वैद्यबद्दलही सांगितलं. राहुल हा शोमध्ये सर्वांत आधी स्वत:चा विचार करायचा, अशी तक्रार त्याने केली. “तो सर्वांसोबत चुकीचा वागायचा. राहुल नेहमी पॉवरफुल लोकांसोबत राहायचा. त्यावेळी त्याचा पॉलिटिकल सर्किटसुद्धा खूप चांगला होता. शोदरम्यान माझं राहुलशी बऱ्याचदा भांडण झालं होतं”, असं अमितने स्पष्ट केलं.
अमितने परीक्षक फराह खानवरही काही आरोप केले. फराह खानकडे जेव्हा तो काही प्रश्न विचारायला जायचा, तेव्हा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची, असं तो म्हणाला. त्यामुळे रिॲलिटी शोमध्ये जे काही दाखवलं जातं, ते सगळंच खरं नसतं, असं अमितने स्पष्ट केलं.