मुंबई- इंडियन आयडॉलचा तेरावा सिझन (Indian Idol 13) सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच या शोचे ऑडीशन्स पूर्ण झाले आहेत. शोसाठी अंतिम 15 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. मात्र यामध्ये रीतो रीबा (Rito Riba) या स्पर्धकाची निवड न झाल्याने चाहते नाराज झाले आहेत. यामुळेच शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. आता जेम्स लिबांग (James Libang) नावाच्या एका सोशल मीडिया युजरने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो इंडियन आयडॉलची रिॲलिटी सांगताना दिसतोय.
या व्हिडीओत एक स्पर्धक इंडियन आयडॉलच्या शोमध्ये ऑडिशन देण्यासाठी येतो. तो ऑडिशनमध्ये दमदार गाणं गातो आणि त्याच्या गायकीने परीक्षकसुद्धा खूश होतात. असं असूनही ते त्याची निवड करत नाहीत. त्यानंतर एक असा स्पर्धक ऑडिशनसाठी येतो, जो ठीकठाक गातो. मात्र तो परीक्षकांसमोर रडून त्याची भावनिक कहाणी सांगतो.
“मी खूप गरी आहे, माझ्या घरी जेवायला नाही. माझ्या वडिलांचा पाय तुटला आहे”, असं तो सांगताना दिसतो. त्याची ही हृदयद्रावक कथा ऐकून परीक्षकसुद्धा भावूक होतात आणि त्याची निवड करतात.
इंडियन आयडॉल या शोमध्ये स्पर्धकांची निवड त्यांच्या प्रतिभेमुळे नाही तर त्यांच्या भावनिक कहाणीमुळे होते, हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून केला गेला. ‘रिॲलिटी शोची रिॲलिटी’ असं कॅप्शन देत संबंधित युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
विशेष म्हणजे रीतो रीबाने स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. रीतो रीबा हा अरुणाचल प्रदेशमधला गायक आणि संगीतकार आहे. रीतोची गायकी प्रेक्षकांना आणि इंडियन आयडॉलच्या परीक्षकांनाही खूप आवडली होती. मात्र तरीसुद्धा त्याची अंतिम 15 मध्ये निवड झाली नाही, म्हणून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
इंडियन आयडॉल हा स्क्रिप्टेड शो आहे असा आरोप नेटकरी करत आहेत. रीतोचा स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा आहे. सोशल मीडियावर त्याचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. ऑडिशनदरम्यान परीक्षक हिमेश रेशमियाँने रीतोला स्वत:चं गाणं गाण्यास सांगितलं. तेव्हा रीतोने स्वत: संगीतबद्ध केलेलं गाणं गाऊन दाखवलं. त्याचं हे गाणं प्रेक्षकांनाही खूप आवडलं होतं.