चार वर्षांनंतर CID परततोय? एकाच फ्रेममध्ये दिसले एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत
नेटकऱ्यांमध्ये CID ची उत्सुकता; शिवाजी साटम यांचा फोटो पाहून कमेंट्सचा वर्षाव
मुंबई- तब्बल 21 वर्षे प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर 2018 मध्ये CID ही लोकप्रिय मालिका बंद झाली. या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला आहे. गेल्या चा वर्षांपासून चाहते या मालिकेची वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी अभिनेते शिवाजी साटम यांनी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र त्यानंतर शूटिंगसंदर्भात कोणतीच अपडेट समोर आली नाही. आता सोशल मीडियावरील त्यांच्या एका फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर CID ही मालिका परत येणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवाजी साटम यांनी CID मालिकेच्या टीमसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये मालिकेचे क्रिएटर बीपी सिंहसुद्धा दिसत आहेत. त्याचसोबत इन्स्पेक्टर दया आणि इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारणारे कलाकार पहायला मिळत आहेत. ‘CID ची गँग, तेसुद्धा बिग डॅडी बीपीसोबत’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
पहा फोटो-
View this post on Instagram
‘सर्वोत्कृष्ट क्राइम शो, मी या मालिकेचे सर्व एपिसोड्स पाहिले आहेत आणि आता मालिका पुन्हा लाँच कधी होणार याची वाट पाहतोय’, असं एकाने लिहिलं. तर ‘लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘लवकरच ही मालिका घेऊन परत या’, अशीही विनंती नेटकऱ्यांनी केली आहे.
या फोटोमुळे चाहत्यांमध्ये मालिकेविषयी पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे. सीआयडीच्या नव्या मालिकेत कोणकोणते कलाकार पहायला मिळणार, याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. 2018 मध्ये मालिका बंद झाल्यानंतर 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा CID चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.