Manoj Bajpayee | तब्बल 170 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत मनोज बाजपेयी? खुद्द अभिनेत्याने दिलं उत्तर
बिहारमधील एका गावात जन्मलेल्या मनोज बाजपेयी यांचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक समस्यांचा आणि संघर्षाचा सामना केला. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेकदा नकारही पचवावा लागला.
मुंबई : अभिनेता मनोज बाजपेयी सध्या ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मनोज यांनी गेल्या काही दिवसांपासून काही मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमध्ये ते बॉलिवूड इंडस्ट्रीपासून ते खासगी आयुष्यापर्यंत विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त होत आहेत. अशाच एका मुलाखतीमध्ये जेव्हा त्यांच्या संपत्तीविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी मजेशीर उत्तर दिलं. मनोज यांची तब्बल 170 कोटींची संपत्ती आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
मनोज बाजपेयी हे जवळपास गेल्या तीन दशकांपासून चित्रपटासृष्टीत सक्रिय आहेत. ओटीटीवरही त्यांनी एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या संपत्तीची माहिती व्हायरल झाली होती. त्याविषयी एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. “तुमची एकूण 170 कोटी रुपयांची संपत्ती आहे का”, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “बाप रे बाप! अलिगढ आणि गली गुलियां करून? माझी इतकी संपत्ती नाही. पण हो इतकी नक्कीच आहे की देवाच्या कृपेने माझं आणि माझ्या पत्नीचं म्हातारपण चांगलं जाऊ शकेल आणि माझी मुलगी तिच्या आयुष्यात सेट होऊ शकेल.”
View this post on Instagram
या मुलाखतीत मनोज यांनी त्यांच्या लाइफस्टाइलविषयीही सांगितलं. “मी दक्षिण मुंबईत राहणारा नाही. ना मी वांद्र्यात राहतो. मी आतासुद्धा अंधेरीतील लोखंडवाला याठिकाणी राहतो. मी नेहमीच म्हणत आलोय की मी चित्रपट, या फिल्म इंडस्ट्रीच्या मध्यभागी नाही. मी या फिल्म इंडस्ट्रीच्या बाऊंड्रीवर बसलोय आणि हा पर्याय मी स्वत: निवडला आहे”, असं तो म्हणाला. बिहारमधील एका गावात जन्मलेल्या मनोज बाजपेयी यांचा बॉलिवूडपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक समस्यांचा आणि संघर्षाचा सामना केला. करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेकदा नकारही पचवावा लागला.
घराणेशाहीबद्दल काय म्हणाले?
‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी घराणेशाहीबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाला. “मी घराणेशाहीमुळे कधी प्रभावित झालो नाही. कारण कोणताच स्टारकिड असे चित्रपट करणार नाही, ज्यामध्ये मी काम करतो. नवाजुद्दीन करू शकेल, जर इरफान खान असता तर त्यानेही केलं असतं किंवा के. के. मेनन असे चित्रपट करू शकेल. हे व्यावसायिक चित्रपट नाहीत. त्यामुळे याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्यात पैसेही गुंतवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही घराणेशाहीचं कारण देऊ शकत नाही. तुमची ऊर्जा वाया घालवू नका. रंगभूमीवर काम करा. जर तुम्ही चांगले कलाकार असाल तर रस्त्यावर परफॉर्म करूनही पैसे कमावू शकता”, असं तो म्हणाला होता.