घटस्फोटानंतर ईशाने सोडलं मौन; म्हणाली “माझ्या मनात खूप भीती..”
नोव्हेंबर 2009 मध्ये ईशा आणि राहुलने लग्न केलं. त्यानंतर जुलै 2014 मध्ये ईशाने मुलगी रियानाला जन्म दिला. 2002 मध्ये ‘कंपनी’ या चित्रपटातील ‘खल्लास’ या गाण्यामुळे ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा कोपिकरने पती रोहित (टिम्मी) नारंगला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घटस्फोट दिला. 14 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या काही वर्षांपूर्वी ईशा तिच्या नऊ वर्षांच्या मुलीला घेऊन वेगळी राहू लागली होती. रियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. ईशा आणि रोहितच्या घटस्फोटाला आता जवळपास वर्ष पूर्ण झालं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशा तिच्या या निर्णयाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा म्हणाली, “माझ्या मनात प्रचंड भीती होती, कारण पुन्हा नव्याने सुरुवात कशी करायची हे मला माहीत नव्हतं. मी 10 वर्षाच्या मुलीसोबत घराबाहेर पडत होती. ती एका वेगळ्या वातावरणात लहानाची मोठी झाली आणि तिला पुढेही सर्व सोयीस्कर जाईल अशा पद्धतीचं मला आयुष्य द्यायचं होतं. कारण जन्मापासूनच ती एका मोठ्या आणि सर्व सोईसुविधा असलेल्या घरात राहिली आहे. त्यामुळे नवी सुरुवात कशी करायची हे मला समजत नव्हतं, पण मला सर्वोच्च शक्तीवर पूर्ण विश्वास होता. रियाना आणि मी खूप सकारात्मक आहोत आणि यापुढे सर्व गोष्टी चांगल्याच घडतील, असा मला विश्वास आहे.”
View this post on Instagram
“मी रोहितच्या घराजवळच नवीन घर घेतलं. तोसुद्धा तिला भेटायला सतत येत असतो. पण आम्ही मुलीचे आईवडील म्हणून भेटतो आणि ही गोष्ट कधीच बदलणार नाही. टिम्मी आणि माझ्यात आता चांगली मैत्री आहे. माझ्या मते जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून काही अपेक्षा ठेवत नाही, तेव्हा ते नातं आणखी चांगलं खुलतं”, असं ईशा पुढे म्हणाली. या मुलाखतीत तिला घटस्फोटामागचं कारण विचारलं गेलं. त्यावर उत्तर देताना ईशाने सांगितलं, “मी एक असं नेमकं कारण सांगू शकत नाही की नेमकं कुठे चुकलं? आम्ही हळूहळू एकमेकांपासून दूर होत गेलो. घटस्फोट हा त्याचा निर्णय होता, तो म्हणाला की हे नातं आणखी टिकवू शकत नाही. त्यावर मी त्याला होकार दिला आणि आम्ही घटस्फोट घेतला. फक्त समजुतदार लोकच असा निर्णय घेऊ शकतात. नात्यात राहून एकमेकांचं आयुष्य असह्य करणं खूप सोपं असतं. पण त्यातून पुढे जाऊन वेगवेगळ्या मार्गाने आपलं आयुष्य जगणं खूप कठीण असतं. पण आमच्या दोघांच्या विकासासाठी जे योग्य आहे ते आम्ही केलं. मी जगा आणि जगू द्या यावर विश्वास ठेवते. जर त्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर मी एक पाऊल मागे घेणंच बरोबर होतं. जर मी त्याच्या जागी असते, तर माझीही त्याच्याकडून हीच अपेक्षा असती.”