‘होय मी गोल्ड डिगरच, कारण माझे पती..’; 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी लग्नाबद्दल ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर
अनेकांनी स्नेहलवर लालची आणि गोल्ड डिगर असल्याची टीका केली. तर काहींनी तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीसुद्धा केली. या ट्रोलिंगवर आता स्नेहलने मौन सोडलं आहे. त्याचसोबत पती आणि सासरच्या मंडळींकडून मिळणाऱ्या पाठिंब्याविषयी वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत सर्वांना मोठा धक्का दिला. या लग्नामुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. त्यानंतर आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला तिच्या खासगी आयुष्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. ‘इश्क का रंग सफेद’ या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री स्नेहल राय हिने नुकताच तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला. स्नेहलने माधवेंद्र कुमार राय या नेत्याशी लग्न केलं असून त्या दोघांच्या वयात 21 वर्षांचं अंतर आहे. लग्नाच्या दहा वर्षांनंतर स्नेहलने याचा खुलासा केला असून यामुळे तिला ट्रोल केलं जातंय. या ट्रोलिंगला आता स्नेहलने सडेतोड उत्तर दिलं आहे.
अनेकांनी स्नेहलवर लालची आणि गोल्ड डिगर असल्याची टीका केली. तर काहींनी तिच्यावर आक्षेपार्ह टिप्पणीसुद्धा केली. या ट्रोलिंगवर आता स्नेहलने मौन सोडलं आहे. त्याचसोबत पती आणि सासरच्या मंडळींकडून मिळणाऱ्या पाठिंब्याविषयी वक्तव्य केलं आहे. ती म्हणाली, “जे लोक मला माझ्या लग्नावरून ट्रोल करत आहेत, त्यांना मी इतकंच सांगू इच्छिते की होय मी गोल्ड डिगर आहे. कारण माझ्या पतीचं हृदय हे 24 कॅरेट सोन्याचं आहे.” यासोबतच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पतीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘माझा माणूस. स्वभाव आणि वेळेसमोर पैशांची काही ओळख नसते. काही लोक ही गोष्ट कधीच समजू शकणार नाहीत.’
View this post on Instagram
स्नेहलची लव्हस्टोरी
स्नेहल रायची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. अभिनयात पदार्पण करण्याआधी स्नेहल अँकर होती. एकदा ती दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ती करत होती आणि त्यावेळी राजकीय नेते तिथे पोहोचले होते. व्हीआयपी पाहुण्यांच्या नावाचा उल्लेख करताना माधवेंद्र हे नाव उच्चारताना ती अडखळली होती. त्यानंतर फ्लाइटमध्येही दोघं सोबत होते. इथूनच दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
वयाच्या 23 व्या वर्षी केलं लग्न
“मी माझ्या लग्नाबद्दलची गोष्ट लपवली नाही. किंबहुना मी माझ्या खासगी आयुष्याबद्दल कधी सार्वजनिकरित्या चर्चा केली नाही. मी माझ्या वैवाहिक आयुष्यात खूप खुश आहे. मी फक्त माझ्या लग्नालाच माझी ओळख मानत नाही. मी वयाच्या 23 व्या वर्षी लग्न केलं. पण लग्न केल्याने करिअर संपतं, यावर माझा विश्वास नाही. मला हे चुकीचे विचार वाटतात”, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती.