‘इश्कबाज’ फेम अभिनेत्रीने लग्नासाठी मागितले मोफत कपडे; मेसेज लीक करून डिझायनरकडून पोलखोल
'इश्कबाज' फेम अभिनेत्री सुरभी चंदनाने एका फॅशन डिझायनरकडे लग्नासाठी मोफत कपडे मागितले आहेत. संबंधित फॅशन डिझायनरने चॅट लीक करून याची पोलखोल केली आहे. जयपूरमध्ये प्रचंड पैसा खर्च करून लग्न करताना कपडे मोफत का हवेत, असा सवाल त्याने केला आहे.
मुंबई : 3 फेब्रुवारी 2024 | ‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी चंदना लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड करण शर्मासोबत ती जयपूरमध्ये लग्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरने सुरभीवर काही आरोप केले आहेत. डिझायनर आयुष केजरीवालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने सुरभीवर लग्नासाठी मोफत कपडे मागण्याचा आरोप केला आहे. सुरभीच्या या मागणीने केवळ डिझायनरलाच नाही तर नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आयुषने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सुरभीवर आरोप केले आहेत. या व्हिडीओमध्ये त्याने चॅटचा स्क्रीनशॉटसुद्धा दाखवला आहे. सुरभीची स्टायलिस्ट साची विजयवर्गीयने सुरभीच्या लग्नासाठी मोफत कपड्यांची मागणी केल्याचं त्याने म्हटलंय. आयुषने सुरभीला लग्नासाठी मोफत कपडे देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यासोबतच त्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओत आयुष म्हणाला, “सेलिब्रिटी त्यांच्या लग्नासाठी मोफत कपडे मागत आहेत. मला या गोष्टीने खूप समस्या आहे आणि अशा गोष्टींची मला खूप चीड येते. जी सेलिब्रिटी जयपूरमध्ये इतके पैसे खर्च करून लग्न करू शकते, त्या सेलिब्रिटीला लग्नाच्या कपड्यांसाठी पैसे द्यायला काय समस्या असावी? तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून तुम्हाला असं वाटतं की मी मोफत कपडे देईन. पण मी असं अजिबात करणार नाही. तुमच्यासारख्या सेलिब्रिटींना कपडे देण्यापेक्षा मी माझ्या एखाद्या ग्राहकाला कपडे देईन, कारण तो तरी मला प्रामाणिकपणे त्याचे पैसे देईल. हे कपडे बनवण्यासाठी मी प्रचंड मेहनत करतो. म्हणूनच मी ते कोणाला मोफत देऊ शकत नाही. माझा बिझनेस चालत नसेल तरी मला पर्वा नाही. तुम्हाला मला ब्लॉक करायचं असेल तर खुशाल करा. पण मी मेहनत करून माझे पैसे कमावणारच.”
सुरभीला लग्नासाठी मोफत कपडे देण्याच्या बदल्यात आयुषला सोशल मीडियावर श्रेय दिले जातील आणि त्याची जाहिरात केली जाईल, असं चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये म्हटलं गेलंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. लग्नासाठी इतके पैसे खर्च करत असताना कपडे का मोफत मागावेत, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. तर सुरभीने फक्त ब्रँड प्रमोशनसाठी असं विचारलं असावं, असं दुसऱ्याने म्हटलं आहे.